तमायचे इलेवनचा अंतिम सामन्यात दणदणीत विजय; ५५ हजार ५५५ रुपयांचे प्रथम पारितोषिक!
ऑल इंडिया कंजरभाट क्रिकेट स्पर्धेचा थरार; अखेरच्या षटकात आयुष तमायचेचा विजयी चौकार, युवराज बाटुंगे बेस्ट बॉलर तर पार्थिव बाटुंगे बेस्ट बॅट्समन
जळगाव : येथील जी. एस. मैदानावर आयोजित ऑल इंडिया कंजरभाट जातीय दिवस-रात्र क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तमायचे इलेवन संघाने शानदार विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरले. अखेरच्या षटकात आयुष तमायचे याने मारलेल्या चौकाराने विजय निश्चित झाला आणि मैदानावर उपस्थित क्रिकेटप्रेमींमध्ये एकच जल्लोष उसळला. चार दिवस रंगलेल्या या स्पर्धेत विविध शहरांतील संघांनी दमदार खेळाचे प्रदर्शन घडविले.
स्वर्गीय गणेश नेतलेकर यांच्या स्मरणार्थ लखन नेतलेकर व राहुल नेतलेकर यांच्या भाईराजा ग्रुप, नरडाणा यांच्या वतीने १३ ते १६ नोव्हेंबरदरम्यान चार दिवसीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव, नंदुरबार, कोल्हापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि अहमदाबाद येथील एकूण १२ संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदवून मैदानात क्रिकेटचा उत्साह निर्माण केला.
अंतिम सामन्यात धावांचा थरार
अंतिम सामना कार्तिक बाटुंगे यांच्या संघ आणि संदीप बागडे यांच्या तमायचे इलेवन संघादरम्यान रंगला. प्रथम फलंदाजी करत कार्तिक बाटुंगे यांच्या संघाने ११० धावांची मजल मारली. तमायचे इलेवनसमोर विजयासाठी १११ धावांचे आव्हान होते. लक्ष्याचा पाठलाग करताना तमायचे इलेवनचा कर्णधार विक्की नवले याने ४८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करीत विजयाचा पाया मजबूत केला. अखेरच्या षटकात आयुष तमायचे याने चौकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.
युवराज बाटुंगे आणि पार्थिव बाटुंगे यांचा विशेष गौरव
स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. युवराज बाटुंगे याने तब्बल २४ बळी घेत सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा मान पटकावला. त्याला शूज व ट्रॉफी देण्यात आली. तर पार्थिव बाटुंगे याने स्पर्धेत सर्वाधिक ३५८ धावा फटकावत सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार मिळविला. त्याला सायकल व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
विजेत्यांना लाखमोलाची बक्षिसे
विजेत्या तमायचे इलेवन संघाला प्रथम क्रमांकाचे ५५ हजार ५५५ रुपये रोख आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली. संघाचा कर्णधार विक्की नवले व संदीप बागडे यांनी हे पारितोषिक स्वीकारले. उपविजेत्या कार्तिक बाटुंगे यांच्या संघाला द्वितीय क्रमांकाचे ३३ हजार ३३३ रुपये रोख व ट्रॉफी देण्यात आली. लखन नेतलेकर व राहुल नेतलेकर यांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
समालोचनाने स्पर्धेत रंगत
कोल्हापूर येथील मुकेश भाट यांनी संपूर्ण स्पर्धेचे बहारदार समालोचन केले. त्यांच्या प्रभावी, रंगतदार शैलीने सामन्यांमधील चुरस अधिक खुलवली आणि उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
यावेळी नरडाणा येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल नेतलेकर, लखन नेतलेकर, बिरजू नेतलेकर, मोहन गारुंगे आणि नरेश बागडे यांच्या हस्ते खेळाडूंना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वितेसाठी कार्तिक बाटुंगे, राज नेतलेकर, गणेश बागडे, राज गागडे, गौतम टीलंगे, गोविंद दहियेकर, विकी दहीयेकर, विराट अभंगे, अनु गारुंगे, रोनक बजरंगे, दिवेश बागडे, रोहित माछरे, गोलू बागडे, गुरु रावळेकर, मोनू रायचंदे यांच्यासह अनेक युवकांनी परिश्रम घेतले.
