Spread the love

शिरपूर पंचायत समितीत लेटलतीफ कर्मचाऱ्यांची मनमानी; आमदारांच्या तपासणीत ५१ जण गैरहजर!

आमदार काशीराम पावरा यांची सकाळी अचानक धडक; १२५ पैकी केवळ ७० कर्मचारी उपस्थित, वर्षभरापासून बायोमेट्रिक मशीन बंद असल्याने संताप

शिरपूर : पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लेटलतीफपणामुळे ग्रामीण भागातून कामासाठी येणाऱ्या शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत आमदार काशीराम पावरा यांनी आज सकाळी शिरपूर पंचायत समिती कार्यालयात अचानक धडक देत उपस्थितीची तपासणी केली. या तपासणीत १२५ पैकी केवळ ७० कर्मचारी उपस्थित, तर तब्बल ५१ अधिकारी-कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळल्याने कार्यालयातील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला.

कार्यालयाची वेळ असूनही कर्मचारी गायब!

पंचायत समिती कार्यालयाची वेळ सकाळी पावणेदहा वाजता असतानाही अनेक कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या. ग्रामीण भागातून विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना अधिकारी-कर्मचारी जागेवर नसल्यामुळे वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात असल्याने नाराजी वाढत होती.

या पार्श्वभूमीवर आमदार काशीराम पावरा यांनी कार्यालयीन वेळेपूर्वीच पंचायत समितीत पोहोचून दहा वाजेपर्यंत उपस्थितीची पाहणी केली. त्यांच्या माहितीनुसार, १२५ कर्मचाऱ्यांपैकी केवळ ७० जण हजर होते, तर ५१ अधिकारी-कर्मचारी गैरहजर आढळले. ग्रामीण जनतेने कामांसाठी केवळ हेलपाटेच मारायचे का, असा संतप्त सवाल आमदारांनी उपस्थित केला.

वर्षभरापासून बायोमेट्रिक मशीन बंद!

कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बसविण्यात आलेले बायोमेट्रिक मशीन तब्बल वर्षभरापासून बंद असल्याचे समोर आल्याने आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उपस्थिती नोंदविण्याची यंत्रणाच बंद असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेळेवर येण्या-जाण्यावर नियंत्रण नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

गटविकास अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना

आमदार काशीराम पावरा यांनी गटविकास अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात शिस्त आणण्याचे निर्देश दिले. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या येण्या-जाण्याची बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करावी, हालचाल नोंदवही नियमित ठेवावी, विनापरवानगी गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून नियमानुसार कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

पंचायत समिती कार्यालय हे ग्रामीण जनतेच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीचे महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या मनमानी उपस्थितीमुळे नागरिकांची कामे रखडत असतील, तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे. आमदारांच्या अचानक तपासणीनंतर तरी शिरपूर पंचायत समितीतील लेटलतीफ कारभाराला आळा बसणार का आणि ग्रामीण जनतेला वेळेत सेवा मिळणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

बाईट : आमदार काशीराम पावरा

Share.
Leave A Reply

Exit mobile version