Spread the love

अमेरिकेतील वडतालधाम मंदिरात भव्य अन्नकूट उत्सव भक्तिभावात साजरा!

२५० हून अधिक पदार्थांचा भगवान चरणी नैवेद्य; आचार्य राकेशप्रसादजी महाराजांसह संतांचे ऑनलाइन आशीर्वाद, अमेरिकेतील लोकप्रतिनिधींची विशेष उपस्थिती

फैजपूर प्रतिनिधी : अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना राज्यातील राले शहरात स्थित श्री स्वामिनारायण मंदिर वडतालधाम येथे दीपावली पर्वानिमित्त भव्य अन्नकूट उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. परमपूज्य धर्मधुरंधर १००८ आचार्य श्री राकेशप्रसादजी महाराज यांच्या पावन आशीर्वादाने, मंदिराचे संस्थापक सद्गुरू शास्त्री श्री भक्तिप्रकाशदासजी स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शास्त्री श्री धर्मप्रकाशदासजी यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

दीपावली उत्सवाच्या निमित्ताने धनत्रयोदशीला पारंपरिक पद्धतीने धनपूजन, काळी चौदसला श्री हनुमानजी महाराजांचे विशेष पूजन, तर दीपावलीच्या मंगलदिनी लक्ष्मीपूजन करण्यात आले. या धार्मिक विधींमुळे मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.

२५० हून अधिक पदार्थांचा भव्य अन्नकूट

उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरलेल्या भव्य अन्नकूटामध्ये हरिकृष्ण महाराज, लक्ष्मीनारायण देव, राधाकृष्ण देव, सीतारामजी, श्रीनाथजी, शिव-पार्वती, गणेशजी आणि कष्टभंजन हनुमानजी यांच्या चरणी २५० हून अधिक प्रकारच्या मिठाया, फरसाण, फळे आणि विविध भाज्यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला.

विशेष म्हणजे, अनेक हरिभक्तांनी आपल्या घरी अत्यंत श्रद्धेने आणि पवित्रतेने विविध खाद्यपदार्थ तयार करून ते भगवानांच्या चरणी अर्पण केले. सामूहिक भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचे दर्शन घडविणारा हा अन्नकूट सोहळा उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला.

संतांच्या प्रवचनातून आध्यात्मिक मार्गदर्शन

याप्रसंगी आयोजित विशेष सत्संग सभेत शास्त्री श्री धर्मप्रकाशदासजी यांनी प्रेरणादायी आध्यात्मिक प्रवचनातून उपस्थित भक्तांना मार्गदर्शन केले. त्यांच्या अमृतमय वाणीतून कथामृताचा लाभ घेताना हरिभक्त मंत्रमुग्ध झाले.

दरम्यान, भारतातून परमपूज्य आचार्य श्री राकेशप्रसादजी महाराज, गुरुवर्य सद्गुरू शास्त्री धर्मप्रसाददासजी आणि सद्गुरू शास्त्री भक्तिप्रकाशदासजी स्वामी यांनी ऑनलाइन माध्यमातून उत्सवात सहभाग नोंदविला. त्यांनी सर्व हरिभक्तांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा देत आशीर्वाद दिले.

यजमान आणि स्वयंसेवकांचे मोलाचे योगदान

उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर परिवारातील यजमान, स्वयंसेवक आणि महिला भक्तांनी विशेष परिश्रम घेतले. अन्नकूटासाठी आवश्यक मिठायांच्या सेवेचे यजमानपद मंदिराचे अध्यक्ष विपुलभाई पटेल आणि जतीनभाई पटेल यांनी स्वीकारले. दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध फरसाण पदार्थ अत्यंत पवित्रतेने आणि भक्तिभावाने तयार करण्याची सेवा परेशभाई पटेल व त्यांच्या परिवाराने केली. विपुलभाई मेहता यांनी उत्सवाच्या अन्य व्यवस्थांची जबाबदारी समर्थपणे सांभाळली.

उत्सवाच्या तिन्ही दिवसांत मंदिरात येणाऱ्या हरिभक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था महिला भक्तांनी उत्साहाने आणि निःस्वार्थ सेवाभावाने केली. त्यांच्या सामूहिक योगदानामुळे संपूर्ण धार्मिक सोहळ्याला सेवाभक्तीची विशेष जोड मिळाली.

अमेरिकेतील लोकप्रतिनिधींची विशेष उपस्थिती

दीपावली उत्सवानिमित्त महापौर टी. जे. कावली, टाउन मॅनेजर ब्रँडन झुईडेमा आणि इन्स्पेक्शन्स विभागाच्या संचालिका शँडी के. पॅजेट यांच्यासह शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वडतालधाम मंदिर परिवाराला दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

सिटी कौन्सिलचे सदस्य सतीश गरिमेला आणि आशित पटेल यांनीही मंदिराला भेट देऊन भव्य अन्नकूटाचे दर्शन घेतले तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला. अमेरिकेच्या भूमीवर भारतीय धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा अनुभव घेण्याची संधी मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.

स्वयंसेवकांची अहोरात्र सेवा

या संपूर्ण सोहळ्याच्या आयोजनात राकेशभाई, रमेशभाई, संजयभाई डोंडा, मयंकभाई, सागरभाई, जयदीप, पूजन, निलेशभाई, चिराग, भगवानजीभाई, दिनेशभाई, केतन वडताल, जिगेश वडताल, रसिकदादा, देवाशिष, योगेश पांडे आणि अमन यांच्यासह अनेक स्वयंसेवकांनी अहोरात्र परिश्रम घेतले. छायाचित्रणाची सेवा कुश (शार्लोट) यांनी बजावली. महिला भक्तांनीही उत्सवाच्या प्रत्येक व्यवस्थेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मोलाचे योगदान दिले.

धार्मिक परंपरेचे जतन, सामूहिक भक्ती, सामाजिक एकोपा आणि निःस्वार्थ सेवाभाव यांचा सुंदर संगम घडविणारा वडतालधाम मंदिरातील दीपावली आणि अन्नकूट उत्सव मंदिर परिवारासाठी अविस्मरणीय ठरला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version