आदिवासी युवतीची राज्यस्तरावर लेखणीची भरारी; लिना सपकाळे ब्लॉग लेखनात तृतीय!
गडचिरोलीतील जनजातीय गौरव दिन महोत्सवात ७० हजारांचे पारितोषिक; पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते सन्मान
जळगाव : ग्रामीण आणि आदिवासी भागातील प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळाल्यास ती राज्यस्तरावरही आपली स्वतंत्र ओळख निर्माण करू शकते, याचा प्रत्यय यावल तालुक्यातील कोसगाव येथील लिना संजीव सपकाळे हिच्या यशातून आला आहे. गडचिरोली येथे आयोजित राज्यस्तरीय जनजातीय गौरव दिन महोत्सवातील ब्लॉग लेखन स्पर्धेत तिने तृतीय क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशाबद्दल तिला ७० हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला.
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी समाजाची संस्कृती, लोककला, रूढी-परंपरा आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यांचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास विभागाच्या वतीने १५ नोव्हेंबर २०२६ रोजी गडचिरोली येथे राज्यस्तरीय जनजातीय गौरव दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील कला, साहित्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
५० स्पर्धकांमधून मिळविला तृतीय क्रमांक
ब्लॉग लेखन स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांमधील एकूण ५० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. राज्यस्तरीय गुणांकन समितीने निर्धारित निकषांच्या आधारे स्पर्धकांच्या लेखनाचे मूल्यमापन केले. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासह दोन स्पर्धकांची प्रोत्साहनपर पारितोषिकांसाठी निवड करण्यात आली.
अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत येणाऱ्या कोसगाव येथील लिना संजीव सपकाळे हिने तृतीय क्रमांक मिळवून आपली लेखनप्रतिभा सिद्ध केली. तिच्या या यशाबद्दल तिला ७० हजार रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
दिग्गज मान्यवरांची उपस्थिती
या राज्यस्तरीय महोत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले. कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, पद्मश्री चैत्राम पवार, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त निकेश सागर (भा.प्र.से.) यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय जनजातीय कार्यमंत्री जुएल ओराम यांचीही या सोहळ्याला उपस्थिती होती.
नवोदित लेखन प्रतिभेला मिळाली प्रेरणा
आदिवासी आणि ग्रामीण भागातील युवक-युवतींमध्ये साहित्य, कला, लेखन आणि सर्जनशीलतेची मोठी क्षमता दडलेली आहे. मात्र, या गुणवत्तेला व्यापक व्यासपीठ आणि योग्य संधी मिळणे आवश्यक असते. लिना सपकाळे हिने राज्यस्तरीय स्पर्धेत मिळविलेल्या यशामुळे ग्रामीण भागातील प्रतिभेला संधी मिळाल्यास ती मोठी झेप घेऊ शकते, हे अधोरेखित झाले आहे.
तिच्या या यशामुळे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावलसह कोसगाव आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, नवोदित युवक-युवतींसाठी तिचे यश प्रेरणादायी ठरत आहे.
