Spread the love

समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी ७० वर्षीय भदंत धम्मपुत्र यांचा आग्रा ते चैत्यभूमी सायकल प्रवास!

‘युद्ध नको, बुद्ध हवा!’ संदेश घेऊन निघालेल्या धम्मप्रवाशाचे जळगावात स्वागत; नालंदा सभागृहात धम्मदेशनेतून समतेचा विचार

जळगाव : समाजातील जातिभेद आणि विषमतेची दरी नष्ट करून समताधिष्ठित समाजाची निर्मिती व्हावी, भगवान बुद्धांचा समतेचा संदेश जनमानसात रुजावा, या उद्देशाने आग्रा येथील पूजनीय भदंत धम्मपुत्र यांनी आग्रा ते चैत्यभूमी असा सायकल प्रवास सुरू केला आहे. वयाच्या ७० व्या वर्षी दररोज सुमारे ७० किलोमीटर अंतर सायकलने पार करणाऱ्या भदंत धम्मपुत्र यांचे जळगाव येथे भीमरमाई प्रतिष्ठानच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.

नालंदा सभागृह, एन. रामाराव सोसायटी, पिंप्राळा येथे हा स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता. १ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या प्रवासादरम्यान भदंत धम्मपुत्र यांचा काल सायंकाळी सुगत तथागत महाविहार येथे मुक्काम होता. त्यानंतर आज सकाळी सात वाजता त्यांनी पुढील प्रवासाला सुरुवात केली. यावेळी नालंदा सभागृहात धम्म उपासक-उपासिकांच्या उपस्थितीत पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले.

‘युद्ध नको, बुद्ध हवा!’ हा संदेश जनमानसात रुजवा

कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत सम्यक संबुद्ध आणि प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर पूजनीय भदंत धम्मपुत्र यांनी उपस्थितांना त्रिशरण व पंचशील दिले. धम्मदेशनेतून त्यांनी आपल्या सायकल प्रवासामागील भूमिका स्पष्ट केली.

समाजातील विषमतेची दरी दिवसेंदिवस वाढत असून माणूस बुद्धांच्या मार्गाकडे जाण्याऐवजी युद्धाच्या दिशेने वळताना दिसत आहे. जगाला वाचवायचे असेल तर हिंसा टाळणे आवश्यक आहे. भगवान बुद्धांच्या विचारांशिवाय जगाला पर्याय नाही. त्यामुळे ‘युद्ध नको, बुद्ध हवा!’ ही घोषणा प्रत्येकाच्या मनामनात रुजली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

तथागत सम्यक संबुद्ध यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या चतु:सूत्रीच्या आधारे आपली तत्त्वप्रणाली जगभर पोहोचवली. हाच विचार आणि वारसा आपल्या उक्ती व कृतीतून जगासमोर मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर केले. त्यांनी अनुयायांना बुद्धांच्या मार्गाने जाण्याचा संदेश दिला. प्रत्येकाचा प्रवास विद्रोहाकडून प्रेमाकडे झाला पाहिजे. प्रेम हेच शाश्वत आणि सत्य असून त्यातूनच माणूस माणसाजवळ येऊ शकतो. समताधिष्ठित समाजरचना समतेच्या तत्त्वावरच उभी राहिली पाहिजे, असे विचार भदंत धम्मपुत्र यांनी मांडले.

मानवनिर्मित भेदभाव नष्ट करण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे होते. अध्यक्षीय मनोगतात त्यांनी मानवी जीवनात धम्माचे महत्त्व अधोरेखित केले. समताधिष्ठित समाजरचनेच्या निर्मितीसाठी पूजनीय भदंत धम्मपुत्र यांनी सुरू केलेला सायकल प्रवास समाजासाठी प्रेरणादायी आणि आदर्शवत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रत्येकाने समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. माणसाने वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून आपल्या कृतीतून तो सिद्ध करावा. स्त्री-पुरुष हा नैसर्गिक भेद असला, तरी मानवनिर्मित भेदभाव हा सर्वाधिक विषारी आहे. तो नष्ट करण्याची जबाबदारी मानवाचीच आहे. ऊन, वारा, थंडी आणि पावसाची पर्वा न करता वयाच्या ७० व्या वर्षी भदंत धम्मपुत्र सायकलने प्रवास करीत आहेत, ही बाब निश्चितच प्रेरणादायी असल्याचे मुकुंद सपकाळे यांनी नमूद केले.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मिलिंद बागुल यांनी केले, तर कार्यक्रमाची भूमिका प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी विशद केली. सूत्रसंचालन बापूराव पानपाटील यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. पूजा साळवे यांनी केले.

यावेळी चेतनभाऊ नन्नवरे, सुनील सोनवणे, आर. टी. सोनवणे, बळीराम साळवे, अभिनव साळवे यांच्यासह मोठ्या संख्येने धम्म उपासक व उपासिका उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version