Spread the love

डिजिटल हयात प्रमाणपत्र तातडीने सादर करा; अन्यथा अनुदान बंद होण्याची शक्यता!

तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांचे लाभार्थ्यांना आवाहन; मोबाईलवरून काही मिनिटांत पूर्ण करता येणार प्रक्रिया

परभणी, दि. २० (प्रतिनिधी – रामचंद्र अन्नदाते) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध शासकीय अनुदान योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी आपले डिजिटल हयात प्रमाणपत्र तातडीने सादर करावे, असे आवाहन परभणीचे तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांनी केले आहे. हयात प्रमाणपत्र सादर न केल्यास संबंधित लाभार्थ्यांचे अनुदान शासन स्तरावरून बंद होण्याची शक्यता असल्याने सर्व लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया विलंब न करता पूर्ण करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, विधवा व दिव्यांग निवृत्तीवेतन योजना राबविण्यात येतात. या योजनांच्या लाभार्थ्यांना डिजिटल पद्धतीने हयात प्रमाणपत्र सादर करता यावे, यासाठी शासनाने ‘बेनिफिशरी सत्यापन ॲप’ विकसित केले आहे.

या ॲपच्या माध्यमातून आधार प्रमाणीकरण आणि फेस ऑथेंटिकेशनद्वारे घरबसल्या डिजिटल हयात प्रमाणपत्र तयार करता येते. प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर त्याची नोंद केंद्र शासनाच्या एनएसएपी पोर्टलवर ऑनलाइन अद्ययावत होते. त्यामुळे लाभार्थ्यांसाठी ही प्रक्रिया अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक झाली आहे.

मोबाईलवरून काही मिनिटांत प्रमाणपत्र तयार करा

डिजिटल हयात प्रमाणपत्र तयार करण्यासाठी लाभार्थ्यांनी गुगल प्ले स्टोअरवरून ‘आधार फेस आरडी ॲप’ आणि ‘बेनिफिशरी सत्यापन ॲप-२’ हे दोन ॲप डाउनलोड करावेत. त्यानंतर ॲपमध्ये भाषा निवडून डिव्हाइस रजिस्ट्रेशन करावे. आधार क्रमांकाच्या आधारे मोबाईल किंवा ई-मेलवर प्राप्त होणाऱ्या ओटीपीद्वारे प्रमाणीकरण पूर्ण करावे. पुढील टप्प्यात मोबाईल कॅमेऱ्याच्या साहाय्याने फेस ऑथेंटिकेशन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर डिजिटल हयात प्रमाणपत्र ऑनलाइन प्राप्त होते.

ही प्रक्रिया लाभार्थी स्वतःच्या मोबाईलवरून करू शकतात. तसेच कुटुंबीयांच्या मदतीने किंवा महा ई-सेवा केंद्र, तलाठी कार्यालय आणि तहसील कार्यालयातील संजय गांधी विभागाच्या माध्यमातूनही हयात प्रमाणपत्र सादर करता येणार आहे.

पात्र लाभार्थ्यांनी विलंब टाळावा

वारंवार सूचना देऊनही अनेक लाभार्थ्यांनी अद्याप हयात प्रमाणपत्र सादर केलेले नाही. त्यामुळे वृद्धापकाळ, विधवा आणि दिव्यांग निवृत्तीवेतन योजनांसह संबंधित अनुदान योजनांच्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी तातडीने डिजिटल हयात प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण करावी. संभाव्य अनुदान खंडित होण्याची वेळ येऊ नये, यासाठी लाभार्थ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन आपले प्रमाणपत्र सादर करावे आणि शासकीय अनुदान अखंडित सुरू ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version