Spread the love

वडाळी आरोग्य उपकेंद्रातच अस्वच्छतेचा विळखा; आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा!

उपकेंद्राच्या आवारात घाणीचे साम्राज्य, तुटलेले दरवाजे-खिडक्या, शौचालयांची दुरवस्था; शेजारी मुतारी अन् पाण्याची टाकी! युवासारथी व एम.जे. ग्रुपच्या पाहणीत धक्कादायक वास्तव समोर

वडाळी, ता. शहादा, जि. नंदुरबार : गावकऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत उपकेंद्राचीच अवस्था दयनीय असेल, तर सामान्य नागरिकांनी आरोग्याची हमी नेमकी कोणाकडून अपेक्षा करावी? वडाळी येथील आरोग्य उपकेंद्राच्या परिसरात घाणीचे साम्राज्य, तुटलेले दरवाजे-खिडक्या, अस्वच्छ स्वच्छतागृहे, बंद वीज व्यवस्था, कार्यालयाच्या भिंतीलगत उघड्यावर लघवी आणि शेजारी सार्वजनिक मुतारी व पाण्याची टाकी, अशा गंभीर समस्या समोर आल्या आहेत. युवासारथी सदस्य आणि एम.जे. ग्रुपच्या सदस्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर उपकेंद्राच्या दुरवस्थेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

गावातील काही रुग्ण आणि जागरूक नागरिकांकडून उपकेंद्राच्या दयनीय परिस्थितीबाबत माहिती मिळाल्यानंतर युवासारथी व एम.जे. ग्रुपच्या सदस्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी आरोग्य केंद्राच्या परिसरात अस्वच्छता आणि पायाभूत सुविधांची दुरवस्था स्पष्टपणे निदर्शनास आली.

८० ते ८५ टक्के तपासण्या उपकेंद्रात; तरी सुविधांचा अभाव!

वडाळी उपकेंद्रातून संपूर्ण गावासह पंचक्रोशीतील तीन गावांच्या आरोग्यविषयक नोंदी सांभाळल्या जातात. लसीकरण, गर्भवती मातांची तपासणी तसेच एनसीडी अर्थात असंसर्गजन्य आजारांची तपासणी यांसारख्या महत्त्वाच्या सेवा येथे पुरविल्या जातात. आरोग्यविषयक जवळपास ८० ते ८५ टक्के तपासण्या उपकेंद्रात होत असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

मात्र, एवढ्या महत्त्वाच्या आरोग्य सुविधेच्या कार्यालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून आले. कार्यालयाच्या आवारात नागरिक उघड्यावर शौचास जात असल्याचे, दरवाजे व खिडक्या तुटलेल्या असल्याचे, आतील खोल्यांची दुरवस्था झाल्याचे तसेच स्वच्छतागृहे अत्यंत खराब स्थितीत असल्याचे पाहणीदरम्यान दिसून आले. वीज फिटिंग उपलब्ध असूनही वीज नसल्याची समस्या असल्याचेही निदर्शनास आले.

या प्रतिकूल परिस्थितीत एक महिला कर्मचारी एकटीच आपले कर्तव्य बजावत असल्याचे चित्र समोर आले. आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच अशा अस्वच्छ आणि असुरक्षित वातावरणात काम करावे लागत असेल, तर प्रशासनाच्या मूलभूत सुविधांबाबतच्या जबाबदारीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

उपकेंद्राशेजारी मुतारी, मुतारीशेजारी पाण्याची टाकी!

उपकेंद्राच्या समस्यांमध्ये सर्वाधिक चिंताजनक बाब म्हणजे अगदी शेजारी असलेली सार्वजनिक मुतारी. मुतारीची अवस्था इतकी अस्वच्छ असल्याचे स्थानिकांनी सांगितले की, नागरिक तिचा वापर न करता उपकेंद्राच्या भिंतीलगतच लघवी करत असल्याचे दिसून येते. त्यामुळे आरोग्य सेवा घेण्यासाठी येणाऱ्या महिला, वृद्ध आणि रुग्णांना या परिसरातून जाताना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते.

याहून गंभीर बाब म्हणजे या मुतारीच्या अगदी शेजारी पाण्याची टाकी आहे. या टाकीतून जवळपास २०० ते ३०० कुटुंबांना पाणीपुरवठा होत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. अस्वच्छता, उघड्यावर होणारी घाण आणि पाणीपुरवठ्याच्या सुविधेची जवळीक यामुळे परिसरातील स्वच्छता व संभाव्य आरोग्यधोक्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.

शेजारील गावांमध्ये डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर परिसरातील स्वच्छता, डास प्रतिबंधक उपाय आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग; कचरा गाडी नेमकी करते काय?

उपकेंद्राच्या परिसरातील आणखी एक समस्या म्हणजे रस्त्यालगत साचणारा सार्वजनिक कचरा. परिसरात मोठ्या प्रमाणावर घनकचरा टाकला जात असल्याने अस्वच्छतेत भर पडत आहे. गावात कचरा संकलनासाठी गाडी कार्यरत असताना या ठिकाणी कचऱ्याचे ढीग का साचतात, कचरा व्यवस्थापन नेमके कसे केले जाते, असा सवाल युवासारथी व एम.जे. ग्रुपच्या सदस्यांनी उपस्थित केला आहे.

ग्रामसेवक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर समस्यांचा पाढा

पाहणीदरम्यान गावातील ग्रामसेवक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना बोलावून उपकेंद्रातील परिस्थिती निदर्शनास आणून देण्यात आली. जवळपास चार ते पाच हजार लोकसंख्येच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या या परिसरात मूलभूत स्वच्छता आणि सुविधांची अशी अवस्था का, नागरिकांच्या आरोग्याची हमी कोण घेणार, तसेच प्रशासनाच्या जबाबदाऱ्या नेमक्या काय आहेत, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.

यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शासनाकडून निधी अपुरा मिळत असल्याचे सांगितले. उपलब्ध परिस्थितीत लवकरच स्वच्छता करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ग्रामसेवकांनीही उपकेंद्राशेजारील जागा साफ करून स्वच्छ करण्यात येईल, अशी हमी दिल्याचे युवकांनी सांगितले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करणार

वडाळीतील आरोग्य उपकेंद्राच्या या समस्येबाबत युवासारथी आणि एम.जे. ग्रुपचे सदस्य संबंधित गटविकास अधिकारी (BDO), तालुका आरोग्य अधिकारी (THO), जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रीतसर निवेदन व कागदपत्रांसह तक्रार दाखल करणार आहेत.

गावातील नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. उपकेंद्राची स्वच्छता, दुरुस्ती, वीज व्यवस्था, मुतारीची योग्य देखभाल, पाण्याच्या टाकीच्या परिसराची स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन यावर तातडीने उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी जागरूक तरुणांनी केली आहे.

वडाळीकरांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न प्रशासनाने गांभीर्याने घेऊन तातडीने ठोस कार्यवाही करावी. केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष स्वच्छता आणि दुरुस्तीची कामे पूर्ण व्हावीत, यासाठी गावातील तरुण पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Share.
Leave A Reply

Exit mobile version