धुळ्यात गो रक्षक संजय शर्मा यांच्या दुकानासह घरावर जमावाचा हल्ला!
२० ते २५ जणांचा जमाव; पाच कंदील परिसरात तोडफोडीचा आरोप, सोशल मीडियावरील वादातून घटना घडल्याची प्राथमिक माहिती
धुळे : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या पाच कंदील परिसरात २० ते २५ जणांच्या जमावाने सामाजिक कार्यकर्ते तथा गो रक्षक संजय शर्मा यांच्या दुकानासह घरावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. प्रभाकर चित्रमंदिराजवळ घडलेल्या या प्रकारामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.
सोशल मीडियावरील वादातून हल्ला झाल्याचा आरोप
प्राथमिक माहितीनुसार, महापौर मायादेवी परदेशी यांच्याविषयी संजय शर्मा यांनी समाजमाध्यमांवर केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानावरून हा प्रकार घडल्याचा आरोप केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील कत्तलखान्यांच्या मुद्द्यावरून भाजपचे काही कार्यकर्ते आणि संजय शर्मा यांच्यात समाजमाध्यमांवर आरोप-प्रत्यारोप सुरू होते. त्यातूनच हा हल्ला झाल्याची चर्चा आहे.
घराची तोडफोड केल्याचा पत्नीचा आरोप
संजय शर्मा यांच्या घरी आलेल्या काही जणांनी घराची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. महापौर मायादेवी परदेशी यांचे चिरंजीव विकी परदेशी, नगरसेवक रोहित चांदवडे आणि माजी नगरसेवक राकेश कुलवार यांनी तोडफोड केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
महापौर आणि आमदारांच्या राजीनाम्याची मागणी
या घटनेनंतर संजय शर्मा यांच्या पत्नीने महापौर तसेच आमदारांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. तसेच घर व दुकानाच्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे धुळे शहरातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांकडून घटनेची चौकशी आणि संबंधित आरोपांची पडताळणी होणे अपेक्षित आहे. हल्ला, तोडफोड आणि त्यामागील कारणांबाबत अधिकृत पोलीस तपशील समोर आल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.
बाईट : संजय शर्मा यांच्या पत्नी
