रोटरी रेल सिटीतर्फे कुऱ्हा पानाचे येथे मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर!
शेतकऱ्यांसह गरजू रुग्णांना दिलासा; तपासणीपासून शस्त्रक्रिया, औषधे, निवास व भोजनाची व्यवस्था मोफत
भुसावळ, संघरत्न सपकाळे : सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाचा वारसा जपत रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी आणि कांताई नेत्रालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी व गरजू रुग्णांसाठी मोफत नेत्रतपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी आयुष्यमान आरोग्य मंदिर, कुऱ्हा पानाचे येथे हे शिबिर होणार आहे.
या शिबिरात रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात येणार असून, मोतीबिंदूचे निदान झालेल्या आणि शस्त्रक्रियेसाठी पात्र असलेल्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी जळगाव येथील कांताई नेत्रालयात नेण्यात येणार आहे. तेथे आवश्यकतेनुसार लेन्स प्रत्यारोपणासह मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आणि संपूर्ण उपचार मोफत केले जाणार आहेत. याशिवाय रुग्णांना एक आठवड्याची औषधेही विनामूल्य देण्यात येणार आहेत.
रुग्णांच्या निवासापासून भोजनापर्यंतची व्यवस्था
उपचारासाठी जळगाव येथे नेण्यात येणाऱ्या रुग्णांच्या निवासाची आणि भोजनाची संपूर्ण व्यवस्था रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे. उपचार पूर्ण झाल्यानंतर सर्व रुग्णांना पुन्हा कुऱ्हा पानाचे येथे सुरक्षितपणे पोहोचविण्यात येईल.
या शिबिराचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लबच्या वतीने करण्यात आले आहे. पूर्वनोंदणीसाठी डॉक्टर प्रतीक्षा फालक, डॉक्टर उमेश बडगुजर, राजेश अटवाल, युवराज डोलसे, भालचंद्र पाटील आणि समाधान पवार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच प्रकल्पप्रमुख मनोज सोनार, रोटरी क्लबचे अध्यक्ष सुरेश न्याती, सचिव डॉक्टर राहुल पांडे आणि विकास पासपांडे यांनी नागरिकांना या सेवाभावी उपक्रमाची माहिती गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
