मुंबई–आग्रा महामार्गावर दरोड्याचा थरार; दरोड्याआधीच टोळी जेरबंद!
ऑपरेशन ऑल आऊटअंतर्गत मोहाडी पोलिसांची कारवाई; इनोव्हा वाहनासह दरोड्याचे साहित्य जप्त, तिघे ताब्यात तर दोघे फरार
धुळे : मुंबई–आग्रा महामार्ग परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव मोहाडी पोलिसांनी उधळून लावला. ‘ऑपरेशन ऑल आऊट’ अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून इनोव्हा वाहनासह दरोड्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य हस्तगत केले आहे. या कारवाईमुळे संभाव्य दरोड्याचा प्रयत्न रोखण्यात पोलिसांना यश आले आहे.
मोहाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लळींग येथील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या रानमळा रस्त्यावर पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी धुळे येथील हमीद अब्दुल रशीद अन्सारी (वय ३३), शकील शेख करीम शेख (वय ४५) आणि समीर शाह जाकीर शाह (वय २०) या तिघांना ताब्यात घेण्यात आले.
या तिघांचे दोन साथीदार गनी आणि जुबेर अन्सारी हे मात्र फरार झाले आहेत. त्यांचा शोध मोहाडी पोलिसांकडून सुरू आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी इनोव्हा वाहनासह दरोड्याच्या तयारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मोहाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने ही मोहीम यशस्वी केली.
दरोडा टाकण्यापूर्वीच संशयितांना ताब्यात घेतल्याने संभाव्य गुन्हा रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. फरार आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून, या कारवाईमुळे मोहाडी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
