Spread the love

शाळेतूनच घडणार उद्याचे पर्यावरण योद्धे; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘१०० ग्रीन आर्मी’ उपक्रमाचा शुभारंभ!

१०० विद्यार्थ्यांवर पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी; वृक्ष संगोपन, बीज बँक, प्लास्टिकमुक्त परिसर आणि जलसंवर्धनासाठी पुढाकार

जळगाव : पर्यावरण संवर्धनाची आवड, निसर्गाप्रती प्रेम आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात बालवयातच रुजवून उद्याची सजग पिढी घडविण्याच्या उद्देशाने मेहरूण येथील संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ‘१०० ग्रीन आर्मी’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाच्या प्रत्यक्ष कार्यात सहभागी करून घेणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत शाळेतील १०० विद्यार्थ्यांची पर्यावरण योद्धे म्हणून निवड केली जाणार आहे. हे विद्यार्थी विविध पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून निसर्गसंवर्धनाचा संदेश शाळेपासून घरापर्यंत आणि घरापासून समाजापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करणार आहेत.

वृक्षारोपणापासून संगोपनापर्यंत प्रत्यक्ष कृती

‘१०० ग्रीन आर्मी’ हा उपक्रम केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित न राहता वृक्षांचे संगोपन, बियांचे संकलन, बीज बँकेची निर्मिती, प्लास्टिकमुक्त परिसर, पाणी बचत, कचरा व्यवस्थापन, पक्ष्यांसाठी पाणपोई आणि पर्यावरणपूरक सण-उत्सव अशा विविध उपक्रमांचा समावेश असणार आहे.

विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व केवळ पुस्तकी ज्ञानातून नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीतून समजावे, यासाठी विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात येणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या परिसरातील किमान पाच कुटुंबांपर्यंत पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचविण्याचा संकल्प या उपक्रमातून करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कुटुंबे आणि नागरिकांमध्येही पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होईल.

‘मुलींना हुंडा नको, लग्नात वृक्षांच्या बिया द्या!’

तुळशी विवाहाच्या शुभमुहूर्तावर या उपक्रमाला सामाजिक प्रबोधनाची जोड देण्यात आली आहे. ‘मुलींना हुंडा नको, लग्नात वृक्षांच्या बिया द्या!’ हा संदेश देत विवाह सोहळ्यांमध्ये अनावश्यक खर्च आणि भेटवस्तूंपेक्षा वृक्षांच्या बियांचे वाटप करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

विवाहासारख्या मंगल प्रसंगातून निसर्ग संवर्धनाचा संदेश समाजात रुजविण्याचा हा अनोखा प्रयत्न असून, या उपक्रमासाठी देवरे कन्स्ट्रक्शनतर्फे ११ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. सामाजिक उत्सवांना पर्यावरणपूरक दिशा देण्याचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.

बीज बँकेतून साकार होणार ‘रूपवाटिका’

शाळेच्या बीज बँक उपक्रमातून संकलित करण्यात आलेल्या बियांपासून रोपांची निर्मिती करून ‘रूपवाटिका’ विकसित करण्याचा मानस आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना बीज संकलन, त्यांची निगा, रोप निर्मिती, लागवड आणि वृक्ष संगोपन यांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.

पर्यावरण संवर्धनाची चळवळ विद्यार्थ्यांपासून सुरू करून समाजापर्यंत पोहोचविण्याचा ‘१०० ग्रीन आर्मी’चा प्रयत्न भविष्यात निसर्गप्रेमी आणि जबाबदार नागरिक घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

पर्यावरण संवर्धन जीवनशैली बनली पाहिजे!

मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले की, पर्यावरण संवर्धन ही केवळ एखाद्या दिवसापुरती किंवा एका व्यक्तीची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची जीवनशैली बनली पाहिजे. लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी प्रेम आणि संवर्धनाची जबाबदारी रुजविल्यास भविष्यात पर्यावरणाबाबत सजग पिढी निर्माण होईल.

आजचे विद्यार्थी उद्याचे पर्यावरण रक्षक होण्याची वाट पाहणारे नव्हे, तर आजपासूनच पर्यावरणाचे योद्धे बनले पाहिजेत. हाच विचार ‘१०० ग्रीन आर्मी’ उपक्रमामागे असून, शाळेच्या या पुढाकारातून पर्यावरण संवर्धनाची नवी चळवळ उभी राहण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version