Spread the love

आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत चमकलेल्या हिमाली बोरोले, ममता प्रजापतींसह शौर्य चौधरीचा गौरव!

आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते क्रीडा साहित्य देऊन सन्मान; आंतरराष्ट्रीय अनुभवाचा लाभ नवोदित महिला खेळाडूंना देण्याचे आवाहन

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटविल्याने जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा मिळत आहे. मलेशियात आयोजित आंतरराष्ट्रीय इंडोर हॉकी स्पर्धेत सहभागी होऊन जळगावचे नाव उंचावणाऱ्या हिमाली विलास बोरोले व ममता जगदीश प्रजापती, तसेच १५ वर्षांखालील फुटबॉल संघात जिल्ह्यातून निवड झालेल्या शौर्य चौधरी या तीन खेळाडूंचा जळगाव जिल्हा फुटबॉल व हॉकी जळगाव संघटनेतर्फे गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.

जळगाव क्रीडा महासंघाचे अध्यक्ष तथा चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते तिन्ही खेळाडूंना क्रीडा साहित्य प्रदान करून सन्मानित करण्यात आले. खेळाडूंच्या यशाचे कौतुक करताना आमदार सोनवणे यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आंतरराष्ट्रीय अनुभव नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरावा

मलेशियात आंतरराष्ट्रीय इंडोर हॉकी स्पर्धेत सहभागी झालेल्या हिमाली बोरोले आणि ममता प्रजापती यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभवाचा लाभ जळगाव जिल्ह्यातील नवोदित महिला हॉकी खेळाडूंना द्यावा. त्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहित करावे, तसेच अधिकाधिक मुलींना क्रीडा क्षेत्राकडे वळण्यासाठी प्रेरित करावे, असे आवाहन आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी केले.

१५ वर्षांखालील फुटबॉल संघात निवड झालेल्या शौर्य चौधरीचेही त्यांनी विशेष कौतुक केले. तिच्या या यशाबद्दल अभिनंदन करत उज्ज्वल क्रीडा भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

जळगावच्या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय भरारी अभिमानास्पद

जळगावच्या खेळाडूंनी जिल्ह्याच्या सीमा ओलांडून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करणे ही संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. योग्य मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि प्रोत्साहन मिळाल्यास जळगावमधील महिला खेळाडू भविष्यात देशाचे प्रतिनिधित्व करून मोठे यश संपादन करू शकतात, असा विश्वास फारुक शेख यांनी व्यक्त केला.

या सत्कार सोहळ्याला जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे तथा हॉकी जळगावचे सचिव फारुक शेख, प्रा. डॉ. अनिता कोल्हे, फुटबॉल संघटनेचे प्रशिक्षक तौसिफ खान आणि पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्रशिक्षक कार्तिक आदी मान्यवर उपस्थित होते.

तीनही खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे जळगावच्या क्रीडा क्षेत्राला नवी प्रेरणा मिळाली असून, त्यांच्या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version