Spread the love

तरुणीवर जबरदस्तीने धर्मांतरासाठी दबाव; देवपुरात चौघांविरोधात गुन्हा दाखल!

‘१० हजार रुपये देतो, इस्लाम धर्म स्वीकार’ असे सांगून दबाव टाकल्याचा आरोप; महिला सुरक्षेसाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना कराव्यात, भाजप पदाधिकारी मोहित देसले यांची मागणी

धुळे : तरुणीवर पैशांचे आमिष दाखवून जबरदस्तीने धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा प्रकार धुळे शहरातील देवपूर परिसरात उघडकीस आला आहे. ‘१० हजार रुपये देतो, इस्लाम धर्म स्वीकार’, असे सांगून तरुणीवर दबाव निर्माण केल्याचा आरोप असून, या प्रकरणी चौघांविरोधात महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महिला सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजप पदाधिकारी इंजिनीयर मोहित देसले यांनी पत्रकार परिषदेत केली.

अल्पवयीन मुलीवर दबाव टाकल्याचा आरोप

दोन दिवसांपूर्वी देवपूर परिसरातील एका ठिकाणी अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिला १० हजार रुपये देण्याचे आमिष दाखवत इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकल्याचा प्रकार घडल्याचे समोर आले. या घटनेनंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांसह हिंदुत्ववादी कार्यकर्ते देवपूर पोलीस ठाण्यात दाखल झाले. संबंधितांविरोधात तक्रार देण्यात आल्यानंतर पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला.

शाळा-महाविद्यालय परिसरात सुरक्षा वाढविण्याची मागणी

या प्रकरणातील आरोपींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी मोहित देसले यांनी केली. तसेच सार्वजनिक ठिकाणांसह शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने विशेष उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.

महिला व अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेता संवेदनशील ठिकाणी पोलीस गस्त वाढविणे आणि अशा तक्रारींवर तातडीने कार्यवाही करणे आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

या घटनेमुळे देवपूर परिसरात चर्चा सुरू असून, प्रकरणाचा पुढील तपास आणि पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version