डिसेंबरमध्ये सर्वाधिक १५, फेब्रुवारीत १४, तर मार्चमध्ये १२ शुभ तारखा; मंगल कार्यालये, लॉन्स आणि केटरिंग व्यावसायिकांकडे बुकिंगला वेग
पुणे : घरोघरी तुळशी विवाहाचा मंगल सोहळा सुरू असतानाच आता विवाहाच्या सनई-चौघड्यांचे सूर घुमण्याची तयारी सुरू झाली आहे. तुळशी विवाहानंतर यंदाच्या लग्नसराईला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार असून, येत्या २५ नोव्हेंबरपासून विवाह मुहूर्त उपलब्ध होत आहेत. मार्च २०२७ पर्यंत विवाहासाठी अनेक तारखा असल्याने आगामी चार महिन्यांत लग्नसमारंभांची मोठी धामधूम पाहायला मिळणार आहे.
यंदाच्या विवाह मुहूर्तांमध्ये डिसेंबर महिना सर्वाधिक गजबजलेला राहणार आहे. या महिन्यात १५ विवाह मुहूर्त असून, फेब्रुवारी २०२७ मध्ये १४, तर मार्चमध्ये १२ मुहूर्त उपलब्ध आहेत. त्यामुळे विवाह इच्छुक जोडप्यांसह त्यांच्या कुटुंबीयांनी लग्नाच्या नियोजनाला सुरुवात केली आहे.तुळशी विवाहानिमित्त शनिवारपासून (दि. २१) घरोघरी सुरू झालेला मंगलमय उत्सव मंगळवारपर्यंत (दि. २४) सुरू राहणार आहे. त्यानंतर २५ नोव्हेंबरपासून विवाह सोहळ्यांचा हंगाम सुरू होईल. या पार्श्वभूमीवर मंगल कार्यालये, लॉन्स, हॉटेल्स, केटरिंग व्यावसायिक, फुलांची सजावट, छायाचित्रण आणि विवाह नियोजनाशी संबंधित व्यावसायिकांकडे बुकिंगसाठी लगबग सुरू झाली आहे.
दरम्यान, सिंहस्थ काळाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या विवाह मुहूर्तांचे आपत्कालीन, अत्यावश्यक आणि शुद्ध अशा स्वरूपात वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे विवाह निश्चित करताना कुटुंबीयांना मुहूर्तांचे वर्गीकरण आणि त्यासंबंधीचे धार्मिक निकष लक्षात घेऊन निर्णय घ्यावा लागणार आहे.
शुद्ध विवाह मुहूर्त
-
जानेवारी २०२७ : २७, २९
-
फेब्रुवारी २०२७ : २, ३, १०, ११, १२, १५, १६, २१, २२, २३, २४, २५, २७, २८
-
मार्च २०२७ : २, ४, १०, ११, १४, २०, २३, २४, २५, २७, २९, ३१
आपत्कालीन व अत्यावश्यक विवाह मुहूर्त
-
नोव्हेंबर २०२६ : २५, २६
-
डिसेंबर २०२६ : २, ३, ४, ५, १०, १२, १३, १४, १५, १८, १९, २७, २८, ३०, ३१
-
जानेवारी २०२७ : १, २, ४, २०, २४, २६
काय आहेत आपत्कालीन आणि शुद्ध मुहूर्त?
सिंहस्थ काळातील विशिष्ट कालखंडात येणाऱ्या काही विवाह तारखांना आपत्कालीन किंवा अत्यावश्यक मुहूर्त म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. तर सिंहस्थ काळाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक निकषांनुसार अनुकूल ठरणाऱ्या कालावधीतील तारखांना शुद्ध विवाह मुहूर्त संबोधले जाते. यंदा या दोन्ही प्रकारचे मुहूर्त उपलब्ध असल्याने विवाहाचे नियोजन करताना कुटुंबीयांना पर्याय मिळणार आहेत.
