Spread the love

दुभाजकावर गौवऱ्या; दुर्गंधीमुळे वाहनचालक, पादचारी आणि रहिवासी हैराण!

मुख्य रस्त्याच्या मध्यभागी शेणाच्या गौवऱ्या वाळवण्याचा प्रकार; उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाजवळच अस्वच्छता, नागरिकांकडून कारवाईची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी – प्रमोद पाटील) : भुसावळ नगरपरिषद हद्दीतील जळगाव, भुसावळ आणि यावलच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य मार्गावरील दुभाजकावर शेणाच्या गौवऱ्या वाळविण्याचा प्रकार समोर आला आहे. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर गौवऱ्या थापून वाळविल्या जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असून, वाहनचालक, पादचारी आणि स्थानिक रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे, हा प्रकार भुसावळ उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानापासून अगदी हाकेच्या अंतरावर सुरू असल्याने सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुख्य रस्त्यावरील दुभाजकाचा अशा प्रकारे वापर होत असताना प्रशासनाचे लक्ष याकडे कधी जाणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सार्वजनिक दुभाजक की गौवऱ्या वाळविण्याचे ठिकाण?

शहरातील मुख्य रस्त्यावरील दुभाजक वाहतुकीचे नियोजन, रस्त्याचे सौंदर्य आणि परिसराची स्वच्छता राखण्यासाठी असतात. मात्र, याच दुभाजकावर शेणाच्या गौवऱ्या वाळविल्या जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. येथून नियमित ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना तसेच पायी जाणाऱ्या नागरिकांना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.

प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी

सार्वजनिक रस्ते आणि दुभाजकांचा वापर अशा प्रकारे होऊ नये, यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने कारवाई करावी. दुभाजकावरील गौवऱ्या हटवून परिसर स्वच्छ करावा आणि भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

शहरातील स्वच्छता आणि सार्वजनिक जागांचे व्यवस्थापन याबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना दुर्गंधीच्या त्रासातून मुक्त करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version