कापडणे जलजीवन मिशनचा भोंगळ कारभार खासदार शोभाताई बच्छाव यांच्या निदर्शनास!
देवभाने फाट्यावर संघर्ष समितीने खासदारांना थांबवून मांडली व्यथा; दिशा समितीच्या बैठकीत मुद्दा गाजणार, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी
कापडणे (प्रतिनिधी) : कापडणे गावातील जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेच्या कामातील कथित अनियमितता, निकृष्ट दर्जा आणि मंजूर सविस्तर प्रकल्प अहवालाला (DPR) डावलून सुरू असलेल्या कामाचा मुद्दा आता खासदार शोभाताई बच्छाव यांच्यापर्यंत पोहोचला आहे. कापडणे शुद्ध पाणीपुरवठा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी खासदारांच्या नियोजित दौऱ्यादरम्यान देवभाने फाटा येथे त्यांना थांबवून योजनेतील विविध त्रुटी आणि नागरिकांच्या समस्या सविस्तरपणे मांडल्या. खासदार बच्छाव यांनी आगामी दिशा समितीच्या बैठकीत हा विषय उपस्थित करून संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी संघर्ष समितीने योजनेतील अनेक महत्त्वाच्या बाबी खासदारांच्या निदर्शनास आणून दिल्या. मंजूर डीपीआरनुसार देवभाने धरणापर्यंत जाणारी १३ इंची पाइपलाइन देवभाने फाट्यावरच थांबविणे, जुन्या ग्रामपंचायत पाइपलाइनला जोडणी देणे, पाण्याच्या टाकीच्या जागेबाबतची कथित अनियमितता, अंगणवाडी व शाळेच्या सुरक्षिततेचा प्रश्न तसेच गावातील अपूर्ण वितरण व्यवस्था याबाबत समितीने आक्षेप नोंदवले.
याशिवाय संबंधित ठेकेदाराविरोधात सुरू असलेल्या ब्लॅकलिस्ट प्रक्रियेचे पुढे काय झाले, याचीही माहिती घेऊन त्याबाबत पाठपुरावा करण्याची मागणी समितीने केली.
दिशा समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित करणार
कापडणे जलजीवन मिशनमधील तक्रारींची दखल घेत खासदार शोभाताई बच्छाव यांनी आगामी दिशा समितीच्या बैठकीत हा विषय आवर्जून उपस्थित करणार असल्याचे सांगितले. संबंधित विभागाकडून योजनेच्या कामाची माहिती घेऊन आवश्यक पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दोषींवर फौजदारी कारवाईची संघर्ष समितीची मागणी
केवळ योजना पूर्ण करून चालणार नाही, तर मंजूर डीपीआर आणि नियमांना डावलून चुकीच्या पद्धतीने काम करणारे अधिकारी, ठेकेदार अथवा संबंधित व्यक्ती चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी संघर्ष समितीने केली आहे.
गावकऱ्यांना शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा मिळणे हा योजनेचा मूळ उद्देश आहे. त्यामुळे कामातील त्रुटी दूर करून मंजूर आराखड्यानुसारच योजना पूर्ण करावी आणि जबाबदारांवर कारवाई करावी, अशी समितीची भूमिका आहे. शुद्ध पाणी मिळेपर्यंत आणि दोषींवर कारवाई होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा निर्धारही समितीने व्यक्त केला.
आता दिशा समितीच्या बैठकीत खासदार शोभाताई बच्छाव हा मुद्दा किती ठामपणे मांडतात आणि संबंधित विभागाकडून काय कार्यवाही होते, याकडे कापडणे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
