Spread the love

ना सरकार, ना ठेकेदार… ग्रामस्थांच्या श्रमदानातून बरडीच्या टांग बारीपाड्यात नदीवर बांध उभारणी!

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; तरुणांसह लहान मुलांचाही सहभाग, ग्रामएकजुटीचा प्रेरणादायी आदर्श

धडगाव (प्रतिनिधी) : जलसंवर्धनासाठी केवळ शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेतल्यास गावाच्या विकासाला नवी दिशा मिळू शकते, याचा प्रेरणादायी आदर्श बरडी गावातील टांग बारीपाडा येथील ग्रामस्थांनी घालून दिला आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून गावातील नदीवर ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून बांध उभारला. विशेष म्हणजे, या कामासाठी ना शासनाचा निधी, ना ठेकेदाराची मदत; तर ग्रामस्थांनी स्वतःच्या श्रमातून हा उपक्रम यशस्वी केला.

पाण्याचे महत्त्व आणि भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन गावातील तरुण, वडीलधारी मंडळी आणि लहान मुलांनी एकत्र येत या कामात सहभाग घेतला. सामूहिक प्रयत्नांतून नदीवर बांध उभारण्याचे काम पूर्ण करण्यात आले. गावाच्या पाणीप्रश्नावर स्वतःच्या ताकदीने उपाय शोधण्याचा ग्रामस्थांचा हा प्रयत्न परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.

तरुणांसह लहान मुलांचाही श्रमदानात सहभाग

या श्रमदान उपक्रमात नरेंद्र तडवी, किसन तडवी, अमित तडवी, सारजाबाई तडवी, जगदीश तडवी, संदीप तडवी, राज्या तडवी, निलेश तडवी, सतीश तडवी आणि आकाश तडवी यांनी सहभाग नोंदविला. तसेच स्वप्निल वसावे, रायसिंग तडवी, अर्जुन तडवी, युवराज तडवी, रविंद्र तडवी यांच्यासह इतर लहान मुलांनीही उत्साहाने हातभार लावला.

भूजलपातळी वाढण्यास होणार मदत

नदीवर बांध उभारल्यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरण्यास मदत होणार आहे. परिणामी भूजलपातळी वाढण्यासह परिसरातील विहिरी आणि अन्य जलस्रोतांना भविष्यात लाभ होण्याची अपेक्षा आहे. तसेच शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यासही या उपक्रमाची मदत होऊ शकते.

दरम्यान, जलसंवर्धनाचे महत्त्व अजूनही अनेकांच्या लक्षात येत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली. आज या कामासाठी १० ते १५ जण पुढे आले असले, तरी उद्या संपूर्ण गावाने अशा उपक्रमांत सहभागी व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

ग्रामएकजुटीतून जलसंवर्धनाचा संदेश

गावाच्या भविष्यासाठी एकत्र आलेल्या श्रमदान करणाऱ्या ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे. बरडीच्या टांग बारीपाड्यातील हा उपक्रम केवळ नदीवर बांध उभारण्यापुरता मर्यादित नसून, गावाची एकजूट, सामाजिक बांधिलकी आणि जलसंवर्धनाची जाणीव अधोरेखित करणारा आहे. शासनाच्या मदतीची वाट न पाहता स्वतःच्या श्रमातून गावाच्या पाणीप्रश्नावर उपाय शोधण्याचा हा प्रयत्न इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो.

Share.
Leave A Reply

Exit mobile version