Spread the love

राजस्थानमध्ये महाराष्ट्रातील भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू

खाटू श्यामजींच्या दर्शनावरून परतताना कोटा-उदयपूर महामार्गावर दुर्घटना; सहा जण गंभीर जखमी, क्रुझर वाहनांचा चक्काचूर

धुळे प्रतिनिधी : राजस्थानमध्ये खाटू श्यामजींच्या दर्शनासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील भाविकांवर काळाने घाला घातला. राजस्थानच्या कोटा परिसरात कोटा-उदयपूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात धुळे जिल्ह्यातील नऊ जणांचा मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे धुळे जिल्ह्यासह परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महाराष्ट्रातील तीन कुटुंबे स्वतंत्र वाहनांतून खाटू श्यामजींच्या दर्शनासाठी राजस्थानला गेली होती. दर्शन आटोपून परतीचा प्रवास सुरू असताना रविवारी मध्यरात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास कोटा-उदयपूर महामार्गावरील शंभुपुरा गावाजवळ हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत क्रुझर वाहनांचा चक्काचूर झाला.

या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये तीन मुले आणि चार महिलांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते.

चालकाला डुलकी लागल्याचा प्राथमिक अंदाज

अपघाताचे नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. मात्र, वाहनचालकाला प्रवासादरम्यान डुलकी लागल्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेची अधिकृत कारणमीमांसा तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

धुळे आणि अमराळे गावावर शोककळा

मृतांमध्ये धुळे जिल्ह्यातील तसेच शिंदखेडा तालुक्यातील अमराळे येथील नागरिकांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. एकाच दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाल्याने संबंधित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जखमींच्या प्रकृतीबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

या अपघातातील मृतांची संपूर्ण नावे, जखमींची माहिती आणि दुर्घटनेबाबतचे अधिकृत तपशील अद्याप प्रतीक्षेत आहेत.

Share.
Leave A Reply

Exit mobile version