Spread the love

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याचा धरणगाव परिसरात मृतदेह आढळला

वर्गमित्राची दुचाकी घेऊन बाहेर पडला; रात्रभर शोध सुरू, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कुटुंबीयांना लागला ठावठिकाणा

मलकापूर प्रतिनिधी : मलकापूर येथील पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय सत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह धरणगाव परिसरातील शेतात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. समाधान सुनील म्हस्के (रा. पांढरदेव, ता. चिखली) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील धरणगावनजीक फौजी ढाब्याजवळील शेतात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

समाधान म्हस्के हा मलकापूर येथील व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय सत्रात शिक्षण घेत होता. तो मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत हद्दीतील गजानन नगरी परिसरात खोली भाड्याने घेऊन मित्रांसोबत राहत होता. शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्याने वर्गमित्राची दुचाकी घेतली. झेरॉक्स आणण्यासाठी जात असल्याचे सांगून तो खोलीबाहेर पडला. मात्र, रात्री दहा वाजेपर्यंत तो परतला नाही.

समाधान बराच वेळ होऊनही खोलीवर न परतल्याने त्याच्या मित्रांनी शोधाशोध सुरू केली. त्याचबरोबर त्याच्या आई-वडिलांनाही याबाबत माहिती देण्यात आली. रात्रभर मित्रांनी परिसरात आणि संभाव्य ठिकाणी त्याचा शोध घेतला; मात्र त्याचा काहीही ठावठिकाणा लागला नाही.

सीसीटीव्ही फुटेजमधून लागला धागा

रविवारी सकाळी समाधानचे वडील सुनील म्हस्के आणि मामा मलकापूर येथे दाखल झाले. त्यांनी व्ही. बी. कोलते महाविद्यालय परिसरातील तसेच शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. त्यामध्ये समाधान शनिवारी सायंकाळी महाविद्यालयासमोरून धरणगावच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले.

त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर धरणगावसमोर फौजी ढाब्याजवळ त्याने नेलेली दुचाकी उभी असल्याचे आढळले. परिसरातील शेतात शोध घेतला असता झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला.

पोलिसांकडून पंचनामा; शवविच्छेदन पूर्ण

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपनिरीक्षक सतीश बेले यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. पोलिसांच्या पंचनाम्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल खर्चे, युगेश खर्चे तसेच माजी नगरसेवक गजानन सोनोने यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.

समाधानच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमुळे महाविद्यालयीन विद्यार्थी आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version