Spread the love

नशिराबादमध्ये दोन दिवसांत शेतमाल चोरीची दुसरी घटना; अंगणातून सात कट्टे लंपास!

सोयाबीनचे सहा, उडदाचा एक कट्टा चोरीला; मागील चोरीतील संशयित पोलिसांच्या ताब्यात, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

नशिराबाद | प्रतिनिधी : नशिराबाद शहरात शेतमाल चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने चोरीची दुसरी घटना घडली आहे. रविवारी (दि. २२ नोव्हेंबर) पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास शेतकरी कांतीलाल सावदेकर यांच्या घराच्या अंगणातून सोयाबीनचे सहा कट्टे आणि उडदाचा एक कट्टा, असे एकूण सात कट्टे अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांतीलाल सावदेकर यांनी आपल्या घराच्या अंगणात सोयाबीन आणि उडदाचा शेतमाल ठेवला होता. पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी संधी साधत अंगणातील शेतमालाचे सात कट्टे चोरून नेले. सकाळी अंगणात पाहणी केली असता शेतमाल चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी; सीसीटीव्ही फुटेज तपास सुरू

चोरीची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. तसेच चोरट्यांचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मागील चोरीतील संशयित पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच जितेंद्र सिताराम पाटील यांच्या घराच्या आवारातून सोयाबीनच्या सहा गोण्या चोरीला गेल्या होत्या. या चोरीप्रकरणातील संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी दिली. कांतीलाल सावदेकर यांच्या घरातून झालेल्या ताज्या चोरीचा तपासही सुरू असून, या प्रकरणातील आरोपींनाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

कमी उत्पादनात चोरीचे संकट; शेतकरी चिंतेत

यंदा कमी पावसामुळे शेती उत्पादनात आधीच घट झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेला आणि मेहनतीने घरापर्यंत आणलेला शेतमाल घराच्या अंगणातूनच चोरीला जात असल्याने शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे. सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे परिसरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या चोरीच्या घटनांचा पोलिसांनी तातडीने छडा लावून शेतमाल चोरीच्या प्रकारांना आळा घालावा, तसेच शेतकऱ्यांना सुरक्षिततेची हमी मिळावी, अशी मागणी शेतकरी आणि नागरिकांकडून होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version