Spread the love

मारहाण, शाळेच्या वेळेत बदल आणि विशिष्ट दुकानातून शैक्षणिक साहित्य खरेदीच्या सक्तीचा मुद्दा ऐरणीवर; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा

धुळे : विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक समस्यांकडे शाळा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी युवा सेनेने आक्रमक पवित्रा घेत चावरा शाळेच्या प्रशासनाला घेराव घातला. विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून होणारी कथित मारहाण, शाळेच्या वेळेचा प्रश्न, शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती आणि शुल्क थकल्याने परीक्षेपासून वंचित ठेवण्याच्या तक्रारींवर युवा सेनेने प्रशासनाला जाब विचारला. मागण्या तातडीने मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवा सेनेचे जिल्हाप्रमुख योगेश मराठे यांनी दिला.चावरा शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांबाबत पालकांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या.

या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट शाळेत धडक देत प्रशासनासमोर पालकांच्या समस्या मांडल्या. यामध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करावी, सकाळच्या सत्रातील शाळेच्या वेळेत बदल करावा, स्वेटर, पुस्तके व गणवेश विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती रद्द करावी, तसेच फी भरली नसल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवू नये, अशा प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

या मागण्यांसंदर्भात युवा सेनेच्या वतीने शाळा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताशी संबंधित प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नये. पालकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करावे, अशी भूमिका योगेश मराठे यांनी मांडली. विद्यार्थ्यांना मारहाण करण्याच्या तक्रारींची चौकशी करून संबंधित शिक्षकांवर कारवाई करावी आणि शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती तातडीने थांबवावी, अशी मागणीही त्यांनी केली. अन्यथा युवा सेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला.

युवा सेनेचे प्रमुख पूर्वेस नाईक, युवा सेना सचिव किरण साळी, विभागीय सचिव अविष्कार भुसे व जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख योगेश मराठे, अमित खंडेलवाल, नितीन मराठे, चेतन धामेच्या यांच्यासह युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version