विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत निवडणूक आयोगाचा दिलासा; बीएलओमार्फत किंवा ECINET ॲपवरून गणना प्रपत्र भरण्याची सुविधा, २८ व २९ नोव्हेंबरला विशेष शिबिरे
मलकापूर प्रतिनिधी : प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट झाले नसल्याने मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची चिंता करणाऱ्या पात्र नागरिकांसाठी निवडणूक आयोगाने महत्त्वाची संधी उपलब्ध करून दिली आहे. विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेंतर्गत मतदार यादीतून नाव वगळल्या गेलेल्या पात्र नागरिकांना ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत पुन्हा गणना प्रपत्र भरून आपले नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांनी २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मात्र, गणना प्रपत्र भरून न देणे, संबंधित पत्त्यावर मतदार उपलब्ध नसणे, स्थलांतर किंवा अन्य कारणांमुळे अनेक पात्र मतदारांची नावे प्रारूप यादीत समाविष्ट झालेली नाहीत. अशा मतदारांना आता आपले नाव पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्याची संधी देण्यात आली आहे.
प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या अनुपस्थित, स्थलांतरित, मृत, दुबार तसेच अन्य कारणांमुळे वगळल्या गेलेल्या मतदारांची यादी मुख्य निवडणूक अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ यांच्याकडेही ही यादी उपलब्ध आहे.ज्या पात्र नागरिकांची नावे प्रारूप मतदार यादीत नाहीत, त्यांनी आपल्या परिसरातील नियुक्त बीएलओ यांच्याशी संपर्क साधून नव्याने गणना प्रपत्र भरून द्यावे. ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी निवडणूक आयोगाने ECINET ॲपवरून ई-साइन सुविधेद्वारे ऑनलाइन प्रपत्र भरण्याची सोयही उपलब्ध करून दिली आहे.
