कर्जाचे हप्ते थकल्याने फायनान्स कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ; जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे
कर्जहप्ते न भरण्याबाबत कोणताही अधिकृत आदेश नसताना संभ्रम; नागरिकांनी नियमित हप्ते भरावेत, कर्मचाऱ्यांचे आवाहन
धुळे प्रतिनिधी : कर्जाचे हप्ते भरू नयेत, असा शासनाचा कोणताही अधिकृत आदेश नसताना नागरिकांमध्ये कर्जफेडीबाबत संभ्रम निर्माण झाल्याने अनेक कर्जदार हप्ते भरण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. कर्जवसुलीवर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर याचा परिणाम होत असून, काही कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत धुळे शहरातील फायनान्स कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
नागरिकांनी कर्जाचे हप्ते नियमित भरावेत, तसेच फायनान्स कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने जनजागृती करून आवाहन करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने फायनान्स कंपन्यांनी कर्जवसुली करताना दादागिरी किंवा बळजबरी करू नये, असे आवाहन केले होते. मात्र, या आवाहनाचा गैरसमज झाल्याने किंवा त्याचा आधार घेत अनेक कर्जदार हप्ते भरण्यास टाळाटाळ करीत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. कर्जवसुलीचे काम ठप्प झाल्याने फायनान्स क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.
फायनान्स कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्या कामावर आणि कर्जवसुलीशी संबंधित उत्पन्नावर अवलंबून असतो. हप्ते वसुली होत नसल्याने कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून, घरखर्च भागविणेही कठीण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना कर्जाचे हप्ते नियमानुसार भरावेत आणि फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी गोपाल जोशी, विकास पाटील, संदीप चौधरी, निलेश कोळी, दीपक भारस्कर, सचिन फुलपगारे, अमित पगारे, विश्वनाथ बोरसे, अक्षय मराठे, चेतन देवरे, अविनाश गावडे यांच्यासह फायनान्स क्षेत्रातील अनेक कर्मचारी उपस्थित होते.
कर्जदार आणि फायनान्स कर्मचारी यांच्यातील वाढता संभ्रम दूर करून दोन्ही बाजूंना दिलासा मिळावा, तसेच आर्थिक व्यवहार सुरळीत व्हावेत, यासाठी प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.
