विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी युवा सेनेचा चावरा शाळेला घेराव!
पालकांच्या तक्रारींची तात्काळ दखल; शिक्षकांकडून मारहाण, शाळेच्या वेळेत बदल, दुकानांची सक्ती आणि परीक्षा रोखण्याच्या मुद्द्यांवर निवेदन
धुळे प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांबाबत पालकांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्यानंतर युवा सेनेने तात्काळ आक्रमक भूमिका घेत चावरा शाळेच्या प्रशासनाला घेराव घातला. विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करून समस्यांचे निराकरण करावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश मराठे यांनी शाळा प्रशासनाला दिला.
पालकांकडून विद्यार्थ्यांना शिक्षकांनी मारहाण केल्याच्या तक्रारी, सकाळच्या सत्रातील शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी, स्वेटर, पुस्तके व गणवेश खरेदीसाठी विशिष्ट दुकानाची सक्ती, तसेच फी भरली नसल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्याच्या कथित प्रकाराबाबत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या.
या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चावरा शाळेत धडक देत प्रशासनाला घेराव घातला आणि विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करावी, पालकांवर साहित्य खरेदीसाठी करण्यात येणारी सक्ती तात्काळ रद्द करावी, शाळेच्या वेळेबाबत पालकांच्या मागणीचा विचार करावा, तसेच फीच्या कारणावरून विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवू नये, अशा मागण्या करण्यात आल्या.
विद्यार्थी आणि पालकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास युवा सेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष योगेश मराठे यांनी शाळा प्रशासनाला दिला. पालकांच्या तक्रारींचे निराकरण करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
युवा सेनेचे प्रमुख पूर्वेस नाईक, युवा सेना सचिव किरण साळी, विभागीय सचिव अविष्कार भुसे आणि जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष योगेश मराठे, अमित खंडेलवाल, नितीन मराठे, चेतन धामेच्या यांच्यासह युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन दिले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताशी संबंधित प्रश्नांवर युवा सेनेने घेतलेल्या या भूमिकेमुळे चावरा शाळा प्रशासन आता पालकांच्या तक्रारींचे निराकरण करून कोणती कार्यवाही करते, याकडे लक्ष लागले आहे.
