बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन; मनसेसह विविध रिक्षा संघटना आक्रमक, जिल्हाधिकारी व परिवहन आयुक्तांना देणार निवेदन
मुंबई : ॲपआधारित दुचाकी प्रवासी वाहतुकीमुळे पारंपरिक रिक्षा व्यवसायासमोर निर्माण झालेल्या स्पर्धेचा मुद्दा आता राज्यव्यापी आंदोलनाच्या केंद्रस्थानी आला आहे. रॅपिडोच्या माध्यमातून सुरू असलेल्या दुचाकी प्रवासी सेवेला विरोध दर्शवत ऑटो रिक्षा पंचायत समितीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रव्यापी रिक्षा बंद आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह विविध रिक्षा वाहतूक संघटनांनी पाठिंबा दिल्याने या प्रश्नावर रिक्षा संघटनांची एकजूट पाहायला मिळत आहे.यासंदर्भात मनसे आणि सर्वपक्षीय रिक्षा वाहतूक संघटनांची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी यावेळी रॅपिडोच्या दुचाकी प्रवासी वाहतुकीबाबत संघटनांच्या आक्षेपांची भूमिका स्पष्ट केली.
परवानग्या आणि नियमांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह
मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये रॅपिडोच्या माध्यमातून दुचाकीवरून प्रवासी वाहतूक केली जात आहे. मात्र, या सेवेसाठी आवश्यक परवानग्या, वाहनांची नोंदणी आणि परिवहन नियमांचे पालन याबाबत रिक्षा संघटनांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.या संदर्भात परिवहन विभागाकडे यापूर्वीही निवेदने आणि पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, संघटनांच्या आक्षेपांवर अद्याप समाधानकारक कार्यवाही झालेली नसल्याचा दावा संजय नाईक यांनी केला. त्यामुळे आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चालकांचे बॅच, नंबर प्लेट आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा
दुचाकीवरून प्रवासी वाहतूक करताना संबंधित चालकांकडे आवश्यक अधिकृत पात्रता असणे, वाहनांना नियमानुसार नंबर प्लेट असणे आणि प्रवासी वाहतुकीसाठी लागू असलेल्या नियमांचे पालन होणे आवश्यक असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.रिक्षा वाहतुकीसाठी विविध नियम आणि अटींचे पालन करावे लागत असताना ॲपआधारित दुचाकी प्रवासी सेवेलाही समान नियम लागू असावेत, अशी मागणी संघटनांनी केली आहे. याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
