उत्कृष्ट ग्रामपंचायतीला पाच कोटींचे पारितोषिक; जनसुविधांसाठी ९० कोटींचा निधी, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन
जळगाव : गावांचा विकास केवळ शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतून शक्य नसून त्यासाठी ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गावाने विकासाची स्पर्धा सकारात्मक पद्धतीने स्वीकारावी आणि जळगाव जिल्ह्याला राज्यात प्रथम क्रमांक मिळवून देण्याचे सामूहिक लक्ष्य ठेवावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पाच कोटींच्या पारितोषिकासाठी प्रयत्न करा
अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतीला पाच कोटी रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळणार आहे. त्यामुळे स्वच्छता, पाणीपुरवठा, शाळा, रस्ते आणि मूलभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य द्यावे. जिल्ह्यात एकाच दिवशी व्यापक स्वच्छता मोहीम राबवून ग्रामस्थ, विद्यार्थी आणि लोकप्रतिनिधींना सहभागी करून घ्यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.जनसुविधा योजनेंतर्गत सुमारे ९० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होत असून, त्यातून स्मशानभूमी, अंतर्गत रस्ते, पाण्याच्या टाक्या, सीसीटीव्ही आणि सार्वजनिक शौचालयांसारख्या सुविधांची उभारणी करावी, असेही त्यांनी सांगितले.
जलसंधारण आणि घरकुलांना प्राधान्य
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता ‘जलतारा’ उपक्रमातून पावसाचे पाणी अडविणे, जमिनीत मुरविणे आणि भूजल पातळी वाढविण्यासाठी लोकसहभागातून कामे करावीत. घरकुल योजनांचे मंजूर उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करावे. सध्या सुमारे ४० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले असून उर्वरित कामांना गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन बैठकांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष गावांमध्ये जाऊन कामांची पाहणी करावी. हे अभियान केवळ अधिकारी-कर्मचाऱ्यांपुरते मर्यादित न राहता संपूर्ण गावाची लोकचळवळ बनले पाहिजे, असे पालकमंत्री म्हणाले.
खासदार स्मिता वाघ यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमधील समन्वयातून गावांचा विकास साधण्याचे आवाहन केले. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी पारितोषिकापेक्षा गावांचा सर्वांगीण विकास महत्त्वाचा असल्याचे सांगितले. अभियानासाठी १०० गुणांचे मूल्यांकन निकष निश्चित केले असून, १६ विभागांच्या समन्वयातून दरमहा आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी सर्व विभागांनी एकत्रितपणे उद्दिष्टपूर्तीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
दुष्काळमुक्त गावाची शपथ; बालविवाहमुक्त भारताचा संकल्प
कार्यशाळेच्या प्रारंभी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी गाव दुष्काळमुक्तीची सामूहिक शपथ दिली, तर जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भदाणे यांनी बालविवाहमुक्त भारताची प्रतिज्ञा दिली.दिवसभर आयोजित विविध सत्रांमध्ये पाणीबचतीबाबत नामदेव नन्नवरे, ग्रामपंचायतींच्या भूमिकेबाबत भाऊसाहेब आकडे, महिला बचत गटांबाबत राजू लोखंडे, चारा साक्षरता अभियानाबाबत प्रदीप झोड, कृषीविषयक गुणांकनाबाबत पद्मनाभ मस्के, सुशासनाबाबत अंजली बर्गे आणि विकसित भारत रोजगार आजीविका मिशनबाबत एन. आर. पाटील यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे यांनी केले. नितीन पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर गटविकास अधिकारी चंद्रकांत बोढरे यांनी आभार मानले.
