मुंबई : घाटकोपरमधील चिरानगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्याच्या कामाने वेग घेतला आहे. स्मारकाच्या पहिल्या टप्प्यातील शोअर पायलिंगचे ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून, तळघरांच्या उत्खननालाही सुरुवात झाली आहे. जुलै २०२९ पर्यंत संपूर्ण स्मारकाचे बांधकाम पूर्ण करून लोकार्पण करण्याचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (झोपु) नियोजन आहे.
चिरानगर येथे अण्णाभाऊ साठे यांचे वास्तव्य असलेल्या घराचे जतन करण्याचा निर्णय झोपु प्राधिकरणाने २०१९ मध्ये घेतला होता. त्यानुसार मूळ वास्तूचे जतन करून परिसर विकसित करण्यासह स्वतंत्र पाच मजली स्मारक उभारण्यात येणार आहे. मात्र, प्रकल्पाच्या जागेवरील रहिवाशांचे पुनर्वसन आणि स्थलांतर प्रक्रियेमुळे कामाला विलंब झाला. अखेर निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जुलै २०२६ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करून कामाला सुरुवात झाली.
सुमारे १८ हजार चौरस मीटर क्षेत्रावर दोन टप्प्यांत हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. प्रकल्पामुळे अंदाजे ७०० झोपड्या बाधित झाल्या असून, पहिल्या टप्प्यासाठी २५० झोपड्यांचे लगतच पुनर्वसन करून ७,५०० चौरस मीटर जागा उपलब्ध करण्यात आली आहे. लवकरच दुसऱ्या टप्प्यातील कामही सुरू होणार आहे.
प्राधिकरणाच्या माहितीनुसार, स्मारकाच्या इमारतीत दोन तळघरे प्रस्तावित असून, त्यासाठी सुमारे ११ मीटर खोल उत्खनन करावे लागणार आहे. एकूण ४० हजार घनमीटर उत्खनन अपेक्षित आहे. यासाठी आवश्यक असलेल्या ९२० पाइलपैकी आतापर्यंत ७५० पाइलचे काम पूर्ण झाले आहे. भू-तांत्रिक तपासणीही पूर्ण झाली असून, उत्खननाचे काम सुरू आहे. याशिवाय अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य पुतळ्याचे मॉडेल अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
स्मारकात विविध सुविधांची रेलचेल
या स्मारकात अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष, साहित्य व कला दालने, शोषितांच्या संघर्षाची माहिती देणारे कक्ष, दृक्श्राव्य केंद्र, ५०० आसनी सभागृह, ३०० व २५० आसनी दोन चित्रपटगृहे, तालीम खोली, उपाहारगृह, पुस्तक व भेटवस्तू विक्री केंद्रांचा समावेश असेल. यासोबतच शिक्षण व संशोधन केंद्र उभारून गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. स्मारक परिसरात अण्णाभाऊ साठे यांचा २० मीटर उंचीचा भव्य ब्राँझचा पुतळाही उभारण्यात येणार आहे.
