चार ते पाच तास आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांची भेट; शेतकऱ्यांना न्याय देण्याचे आश्वासन
जळगाव : पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवल्याच्या आरोपावरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा संताप अखेर उफाळून आला. पीक विमा कंपनीच्या कारभाराविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. तब्बल चार ते पाच तास चाललेल्या आंदोलनानंतर सायंकाळी सहा वाजता जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांच्या तक्रारी ऐकून घेत न्याय देण्याचे आश्वासन दिले.
५ हजार ८०० अर्ज अपात्र ठरवल्याचा आरोप
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, मार्च आणि एप्रिल महिन्यात कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता अनेक शेतकऱ्यांची नावे पीक विम्याच्या यादीतून वगळण्यात आली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तब्बल ५ हजार ८०० शेतकऱ्यांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले. वेगवेगळी कारणे पुढे करून शेतकऱ्यांना विम्याच्या लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करण्यात आला.
कंपनीच्या कारभारावर संताप
पीक विम्याची रक्कम कमी देता यावी, यासाठी कंपनीकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी शेतकरी कंपनीकडे गेले होते. मात्र, तक्रारींचे समाधानकारक निराकरण न झाल्याने शेतकऱ्यांची संख्या वाढत गेली आणि आंदोलनाने मोठे स्वरूप धारण केले. विशेष म्हणजे, कोणतेही ठराविक नेतृत्व किंवा राजकीय चेहरा नसताना शेतकरी स्वतःहून एकत्र आले.
सरसकट विमा लाभाची मागणी
जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्यावा, अपात्र ठरवलेल्या अर्जांची फेरतपासणी करावी आणि तांत्रिक कारणांवरून शेतकऱ्यांना विम्यापासून वंचित ठेवू नये, अशी मागणी आंदोलकांनी केली.जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आता ५ हजार ८०० अर्जांची फेरतपासणी होते का आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष विमा लाभ मिळतो का, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
