Spread the love

कजगावमध्ये तरुणावर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार; परिसरात खळबळ!

पारोळा रस्त्यावर कामासाठी जात असताना हल्ला; जयेश धोबी गंभीर जखमी, उपचारासाठी धुळ्यात हलविले

भडगाव (प्रतिनिधी) : गणेश रावळ

भडगाव तालुक्यातील कजगाव येथील गोडगाव रोड परिसरात मंगळवारी (दि. २४ नोव्हेंबर) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एका तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे कजगावसह परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कामावर जात असताना गोळीबार

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जयेश नाना धोबी (पवार) हा तरुण पारोळा रस्त्यावरील सोलर कंपनीत कामासाठी जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात जयेश गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्याला धुळे येथे हलविण्यात आले.

पोलिसांकडून तपास सुरू

गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे. गोळीबार करणारे हल्लेखोर कोण होते, त्यांनी हा हल्ला कोणत्या कारणातून केला आणि त्यामागे नेमका काय हेतू होता, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

कजगावसारख्या परिसरात गोळीबाराची घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हल्लेखोरांचा शोध घेऊन घटनेमागील कारण उघड करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलीस तपासातून या प्रकरणातील अधिक तपशील समोर येण्याची अपेक्षा आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version