Spread the love

पोदार रुग्णालयातील आयसीयूसाठी वरळीकरांचा एल्गार; संविधानदिनी लाक्षणिक उपोषण!

सात वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला तीव्र आंदोलनाचे स्वरूप; शासनाच्या लेखी प्रतिज्ञापत्रानंतरही दोन वर्षांपासून आयसीयू सुरू होण्याची प्रतीक्षा, ‘मिशन माणुसकी’चा इशारा

मुंबई (प्रतिनिधी) : वरळी येथील म. आ. पोदार रुग्णालयात अतिदक्षता विभाग (आयसीयू) तातडीने सुरू करण्यात यावा, या मागणीसाठी गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाने आता निर्णायक वळण घेतले आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगासमोर लेखी प्रतिज्ञापत्र सादर करून दोन वर्षांचा कालावधी उलटला, तरी प्रत्यक्षात आयसीयू सुरू झालेला नाही. शासनाच्या या दिरंगाईचा निषेध करण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याच्या मूलभूत हक्कासाठी येत्या गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी भारतीय संविधान दिनानिमित्त वरळीकरांच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. वरळीतील बीडीडी चाळ क्रमांक १ समोर हे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती ‘मिशन माणुसकी’ने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

सात वर्षांचा संघर्ष, तरीही आयसीयू कागदावरच!

वरळी हा मुंबईतील दाट लोकवस्तीचा आणि कष्टकरी नागरिकांची मोठी संख्या असलेला परिसर आहे. या भागातील सर्वसामान्य नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी पोदार रुग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. विशेष म्हणजे, या मागणीसंदर्भात राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगासमोर लेखी प्रतिज्ञापत्र सादर केले होते. मात्र, दोन वर्षे उलटूनही आयसीयू प्रत्यक्षात कार्यान्वित झालेला नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

गंभीर आजार, अपघात किंवा अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत आयसीयूची सुविधा उपलब्ध असणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशा वेळी रुग्णांना अन्य रुग्णालयांत हलविण्याची वेळ येऊ नये आणि परिसरातील नागरिकांना वेळेत उपचार मिळावेत, ही वरळीकरांची प्रमुख मागणी आहे.

१ नोव्हेंबरच्या सत्याग्रहानंतरही शासनाचे दुर्लक्ष?

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वरळीकरांनी १ नोव्हेंबर रोजी शांततामय मार्गाने ‘सविनय सत्याग्रह’ केला होता. मात्र, या आंदोलनाची शासनाकडून अपेक्षित दखल घेतली गेली नसल्याचा आरोप मिशन माणुसकीने केला आहे. त्यामुळे आता संविधान दिनाचे औचित्य साधून लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या आंदोलनाचा अधिकृत इशारा देणारे निवेदन २० नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना सादर करण्यात आले आहे.

संविधान दिनी आरोग्याच्या मूलभूत हक्कासाठी लढा

भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. आरोग्य सुविधा आणि आपत्कालीन उपचारांची उपलब्धता हा नागरिकांच्या जीवनाच्या अधिकाराशी निगडित महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे पोदार रुग्णालयातील आयसीयू सुरू करण्याची मागणी ही केवळ एका परिसरापुरती मर्यादित नसून लाखो नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे.

‘हे लाक्षणिक उपोषण आमच्या असहायतेचे प्रतीक नसून लाखो वरळीकरांच्या जीवाशी निगडित हक्काच्या लढ्याचे प्रतीक आहे. आता पोकळ आश्वासने आणि तारीख पे तारीखची चालढकल खपवून घेतली जाणार नाही,’ असा स्पष्ट इशारा मिशन माणुसकीचे अध्यक्ष रजनीश कांबळे आणि सरचिटणीस अंबर भालेराव यांनी दिला आहे.

मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

राज्य शासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून मानवी हक्क आयोगासमोर दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार पोदार रुग्णालयातील आयसीयू त्वरित कार्यान्वित करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. २६ नोव्हेंबरच्या लाक्षणिक उपोषणानंतरही मागणीची पूर्तता न झाल्यास अधिक तीव्र आणि व्यापक जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे. या आंदोलनातून उद्भवणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीची जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या निवेदनाच्या प्रती महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष व सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे प्रधान सचिव, म. आ. पोदार रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि वरळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.

आता संविधान दिनी वरळीकरांचा आवाज शासनापर्यंत पोहोचतो का आणि पोदार रुग्णालयातील आयसीयू सुरू करण्याबाबत ठोस निर्णय होतो का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version