सहा जणांपैकी तिघांचे मृतदेह आढळले : १३ वर्षीय मुलगा बचावला, दोन मुले बेपत्ता
जळगाव : रोजगाराच्या शोधात जळगावहून गुजरातच्या दिशेने निघालेल्या एका कुटुंबावर वाटेतच भीषण संकट कोसळले. गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ चार जणांनी या कुटुंबाला अडवून सहा सदस्यांना कालव्याच्या खोल पाण्यात फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून, १३ वर्षीय मुलगा सुदैवाने बचावला आहे. अन्य दोन मुले अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणामुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथे वास्तव्यास असलेले नितीन ऊर्फ भुऱ्या पाटील हे एरंडोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कारखान्यात मजूर म्हणून काम करत होते. अधिक रोजगार मिळविण्याच्या उद्देशाने ते २१ नोव्हेंबर रोजी आपल्या कुटुंबीयांसह सुरतच्या दिशेने निघाले होते. मात्र, प्रवासादरम्यान त्यांच्या कुटुंबावर हा जीवघेणा प्रसंग ओढवला.
उवा गावाजवळ वाहन अडवून हल्ला
सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ पाटील कुटुंबाचे वाहन पोहोचले असता, दुसऱ्या कारमधून आलेल्या चार जणांनी त्यांच्या वाहनासमोर गाडी आडवी लावून त्यांना अडवले. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांना जबरदस्तीने वाहनाबाहेर काढून जवळच्या कालव्याच्या खोल पाण्यात फेकल्याचा आरोप आहे. हा प्रकार केल्यानंतर संशयितांनी घटनास्थळावरून पलायन केले.
पाईप पकडल्याने मुलाचा जीव वाचला
कालव्यात फेकण्यात आलेल्या कुटुंबातील १३ वर्षीय मुलाने प्रसंगावधान राखत कालव्यातील एका पाईपला घट्ट पकडून ठेवले. त्यामुळे तो पाण्याच्या प्रवाहात वाहून जाण्यापासून बचावला. काही वेळानंतर त्याने कालव्याबाहेर येत जवळच्या हॉटेलमध्ये धाव घेतली. तेथे घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि शोधमोहीम सुरू झाली.
तिघांचे मृतदेह आढळले
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कालव्याच्या परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान महुवा तालुक्यातील डुंगरीजवळ कालव्यात तीन मृतदेह आढळून आले. त्यामध्ये एक पुरुष, एक महिला आणि एका तरुणीचा समावेश आहे. नातेवाईकांनी मृतदेहांची ओळख पटवली असून, मृत पुरुषाचे नाव नितीन ऊर्फ भुऱ्या पाटील आणि महिलेचे नाव कविता पाटील असल्याचे समोर आले आहे. कविता पाटील यांच्या पहिल्या पतीचे निधन झाल्यानंतर त्या नितीन पाटील यांच्यासोबत राहत होत्या.
दोन मुलांचा शोध सुरूच
या घटनेनंतर प्रथमेश पाटील आणि हरीश पाटील ही दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांकडून कालव्याच्या परिसरात त्यांचा शोध घेतला जात आहे. पाण्याचा प्रवाह आणि कालव्याची खोली लक्षात घेता शोधमोहीम आव्हानात्मक ठरत आहे.
