Spread the love

सोलापूरच्या पहिल्या मराठी साहित्य संमेलनात प्रा. सुरेश नारायणे यांची निवड!

परिसंवादात मांडणार ‘ढोर समाजाचे कला आणि साहित्य क्षेत्रातील योगदान’; कवी संमेलनातही कवितांचे सादरीकरण

नांदगाव (प्रतिनिधी) : सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या मराठी साहित्य संमेलन २०२६ मध्ये नांदगाव येथील साहित्यिक, कवी तथा प्राध्यापक सुरेश माधवराव नारायणे यांना परिसंवाद आणि कवी संमेलनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक योगदानाची दखल घेत मिळालेले हे निमंत्रण नांदगावच्या साहित्य क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

कक्कय्या कला साहित्य परिषद, सोलापूर यांच्या वतीने शनिवार, दि. २८ नोव्हेंबर २०२६ रोजी या पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री तथा लोकसभा सदस्य सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

या संमेलनात ‘ढोर समाजाचे कला आणि साहित्य क्षेत्रातील योगदान’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादात प्रा. सुरेश नारायणे सहभागी होऊन आपले विचार मांडणार आहेत. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी मुंबई येथील डॉ. उषा खंदारे राहणार असून, विविध मान्यवर साहित्यिकही यात सहभागी होणार आहेत.

याशिवाय दुपारी आयोजित कवी संमेलनात प्रा. नारायणे आपल्या स्वरचित कवितांचे सादरीकरण करणार आहेत. या कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान खोपोली येथील डॉ. सुभाष कटकोधोंड भूषविणार आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागांतील नामवंत कवींना या संमेलनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

प्रा. सुरेश नारायणे हे साहित्य, कविता, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत. ‘मनोमनी’, ‘काव्यझुला’ आणि ‘शब्दांचं जगणं’ हे त्यांचे साहित्यिक लेखन व काव्यसंग्रह वाचकांच्या परिचयाचे आहेत. त्यांच्या साहित्यिक वाटचालीला सोलापूरच्या पहिल्या मराठी साहित्य संमेलनात मिळालेली ही संधी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

या निमंत्रणामुळे नांदगावच्या साहित्यिक वर्तुळात आनंदाचे वातावरण असून, विविध साहित्यिक, मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून प्रा. सुरेश नारायणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version