जळगाव जिल्ह्यातील १३८ अंगणवाड्या होणार ‘स्मार्ट’; बालशिक्षणाला आधुनिकतेची जोड!
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराला यश; जिल्ह्यातील मंत्री व आमदारांचे सहकार्य
धरणगाव तालुक्यातील १४, तर जळगाव तालुक्यातील ७ अंगणवाड्यांचा समावेश; शासन निर्णयातून मंजुरी
मुंबई / जळगाव / पाळधी (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील चिमुकल्यांनाही आधुनिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि अंगणवाड्यांचे स्वरूप अधिक गुणवत्तापूर्ण व्हावे, या उद्देशाने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून आणि जिल्ह्यातील मंत्री व आमदारांच्या सहकार्याने जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या आधुनिकीकरणाला चालना मिळणार आहे. महिला व बालविकास विभागाच्या २ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयासोबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत जळगाव जिल्ह्यातील १३८ अंगणवाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये धरणगाव तालुक्यातील १४, तर जळगाव तालुक्यातील ७ अंगणवाड्यांचा समावेश आहे.
राज्य शासनाने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राज्यातील ३ हजार ८३२ अंगणवाड्यांसाठी ६३ कोटी ५ लाख ९३ हजार ९२० रुपये खर्चाच्या स्मार्ट अंगणवाडी किट खरेदीस मान्यता दिली आहे. प्रत्येक अंगणवाडीला १ लाख ६४ हजार ५६० रुपये किमतीचा संच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शासन निर्णयाच्या परिशिष्टात राज्यातील १ हजार ६८७ अंगणवाड्यांची नावे निश्चित करण्यात आली असून, त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील १३८ अंगणवाडी केंद्रांचा समावेश आहे.
धरणगाव व जळगाव तालुक्यातील अंगणवाड्यांचा समावेश
धरणगाव तालुका – १४ अंगणवाड्या : बोरखेडा, दोनगाव बु., नांदेड, नरणे, सार्वे, टहाकळी, भोद खु., हिंगोणे बु., पिंप्री खु., झुरखेडा, अनोरे, बांभोरी बु., सोनवद बु. आणि वाघळूद खु.
जळगाव तालुका – ७ अंगणवाड्या : भादली बु., कडगाव, कुंसुबे खु., वराड, वसंतवाडी, विटनेर आणि कंडारी.
तालुकानिहाय १३८ अंगणवाड्यांचे वाटप
शासन निर्णयातील यादीप्रमाणे जिल्ह्यातील तालुकानिहाय अंगणवाड्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.
-
भुसावळ – ३४
-
अमळनेर – २९
-
चोपडा – २०
-
धरणगाव – १४
-
मुक्ताईनगर – १४
-
यावल – ८
-
जळगाव – ७
-
रावेर – ७
-
एरंडोल – ३
-
बोदवड – २
अशा एकूण १३८ अंगणवाड्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
ई-लर्निंगसह आधुनिक शैक्षणिक सुविधा
स्मार्ट अंगणवाडी संकल्पनेतून बालकांना ई-लर्निंगची साधने, आधुनिक शैक्षणिक साहित्य, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर राहणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बालकांच्या पूर्वप्राथमिक शिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळून त्यांच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.
जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यापूर्वीही जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विविध सुविधांना प्राधान्य दिले आहे. या उपक्रमाला जलसंपदामंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांच्यासह जिल्ह्यातील मंत्री, खासदार आणि आमदारांचे सहकार्य लाभत आहे.
उर्वरित अंगणवाड्यांनाही संधी
राज्यातील उर्वरित २ हजार १४५ स्मार्ट अंगणवाडी किटचे जिल्हानिहाय वाटप निश्चित करण्याचे अधिकार एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी वाटपात जळगाव जिल्ह्यातील आणखी अंगणवाड्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील बालकांना आधुनिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
