सरकारी नोकरी, बंगल्याचा आग्रह नको; निर्व्यसनी, कष्टाळू तरुणांना पसंती द्या! – पालकमंत्री गुलाबराव पाटील
धरणगावात तीन राज्यांतील मराठा समाजबांधवांचा ऐतिहासिक मेळावा; राजमाता जिजाऊ मंगल कार्यालयाचे भूमिपूजन, हजारोंच्या उपस्थितीत समाजप्रबोधनाचा जागर
धरणगाव / जळगाव (प्रतिनिधी) : विवाहासाठी जोडीदार निवडताना मुलींनी केवळ सरकारी नोकरी आणि बंगल्याची अपेक्षा न ठेवता निर्व्यसनी, कष्टाळू आणि कर्तृत्ववान तरुणांना पसंती द्यावी. तरुणांनीही केवळ नोकरीच्या मागे न लागता आधुनिक शेती, उद्योग आणि व्यवसायाकडे वळावे. समाजाने एकत्र येऊन संघटितपणे प्रगती साधावी, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. धरणगाव येथील मराठा समाजाच्या मंगल कार्यालयाच्या उभारणीसाठी आमदार व खासदार निधीतून ५० लाख रुपये उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
अखिल भारतीय सूर्यवंशी क्षत्रिय मराठा मंडळ, जळगाव यांच्या वतीने रविवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी धरणगाव येथे भव्य मराठा समाज मेळावा, वधू-वर परिचय मेळावा, मंगल कार्यालय भूमिपूजन सोहळा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नियोजित राजमाता जिजाऊ मराठा समाज मंगल कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी वधू-वर परिचय पुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी धरणगाव पंचायत समितीच्या माजी सभापती सुरेखा अनिल पाटील होत्या. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांतील हजारो समाजबांधव आणि माता-भगिनींच्या उपस्थितीमुळे मेळाव्याला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.
समाजातील विवाहविषयक अपेक्षांमध्ये बदल घडवा!
पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, विवाह ठरविताना मुला-मुलींनी एकमेकांचे गुण, स्वभाव, कष्ट करण्याची तयारी आणि निर्व्यसनी जीवनशैली यांना महत्त्व द्यावे. मुलींनी केवळ सरकारी नोकरी किंवा मोठ्या बंगल्याचा आग्रह धरू नये. तरुणांनीही नोकरीच्या अपेक्षेत वेळ घालवण्याऐवजी आधुनिक शेती आणि अन्य व्यवसायांत संधी शोधाव्यात.
विवाह ठरल्यानंतर मुला-मुलींनी मोबाईलचा अतिवापर टाळावा आणि त्याचा उपयोग योग्य कामांसाठीच करावा, असेही त्यांनी सांगितले. राजमाता जिजाऊ मंगल कार्यालयाचे काम वर्षभरात पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. यासाठी वस्त्रोद्योगमंत्री, खासदार आणि आमदारांनी आर्थिक सहकार्याची ग्वाही दिली असून, गरज भासल्यास वैयक्तिक मदतही करू, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.
तरुणांनी उद्योजकतेकडे वळावे – खासदार स्मिता वाघ
आजच्या स्पर्धेच्या युगात समाजातील तरुणांनी केवळ नोकरीवर अवलंबून न राहता उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात संधी निर्माण कराव्यात, असे आवाहन खासदार स्मिता वाघ यांनी केले. सुसंस्कृत, सक्षम आणि प्रगत समाज घडविण्यात आईचे योगदान सर्वांत महत्त्वाचे असते. त्यामुळे महिलांच्या भूमिकेचा आणि योगदानाचा सन्मान केला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
नाती जुळविण्याबरोबरच सामाजिक परिवर्तनाचा संकल्प
मेळाव्यात विवाहेच्छुक युवक-युवतींनी व्यासपीठावरून स्वतःचा परिचय करून देत भावी जोडीदाराबाबतच्या अपेक्षा व्यक्त केल्या. मात्र हा मेळावा केवळ वधू-वर परिचयापुरता मर्यादित राहिला नाही. समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांना आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आले.
साखरपुडा, मेहंदी आणि प्री-वेडिंगसारख्या अनावश्यक खर्चिक प्रथा तसेच अंत्यविधीप्रसंगी भाषणे करण्याची पद्धत बंद करण्याबाबत समाजाने निर्णय घेतल्याचे यावेळी सांगण्यात आले. या निर्णयांमुळे सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने एक पाऊल टाकण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक, कृषी आणि व्यावसायिक क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या समाजबांधवांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानही करण्यात आला.
केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांच्याकडून दीड हजार भगिनींना दिवाळीची स्नेहभेट
मेळाव्यानिमित्त केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांनी समाजातील माता-भगिनींसाठी विशेष स्नेहभेट म्हणून एक हजार ५०० वाण आणि भेटवस्तू पाठविल्या होत्या. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
या मेळाव्यास वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, मध्य प्रदेशातील खंडवा मतदारसंघाचे खासदार ज्ञानेश्वर पाटील, आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार मंगेश चव्हाण, माजी मंत्री गुलाबराव देवकर, धरणगावच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा लीलाताई सुरेश चौधरी, धानोऱ्याचे सरपंच भगवान महाजन, प्रबोधनकार ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जानकीराम पाटील, गणेश चव्हाण, समाजाचे अध्यक्ष सोमनाथ मराठे, माजी अध्यक्ष भानुदास पाटील, पी. के. पाटील यांच्यासह दक्षिणी क्षत्रिय मराठा समाजाचे मान्यवर, नवनिर्वाचित नगरसेवक, सरपंच, वैवाहिक तंटामुक्ती समितीचे सदस्य, वारकरी शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी, समाजाचे आजी-माजी पदाधिकारी आणि हजारो समाजबांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजाचे अध्यक्ष सोमनाथ रघुनाथ मराठे यांनी केले. समाजातील शिक्षक व शिक्षिकांनी सूत्रसंचालन केले, तर संचालक पी. के. पाटील यांनी आभार मानले. मेळाव्याच्या यशस्वितेसाठी समाजाचे विद्यमान व माजी अध्यक्ष, संचालक मंडळ, धरणगाव येथील मोठी व लहान मराठे गल्ली समाज मंडळ, एरंडोल गांधीपुरा समाज मंडळ, जळगाव महिला मंडळ, युवा मंडळ तसेच गावोगावच्या समाजबांधवांनी विशेष परिश्रम घेतले.
