Spread the love

अंकुश जाधव यांचे आमरण उपोषण अखेर मागे; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता!

नायब तहसीलदार चेयनसिंग बोहरे व संतोष सोनवणे यांच्या हस्ते सरबत देऊन उपोषण सोडविले; गट क्रमांक १७ मधील सामाईक विहिरीच्या वादावर कार्यवाहीचे आश्वासन

सोयगाव प्रतिनिधी – शिवराम जाधव

सोयगाव : तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेले माळेगाव येथील अंकुश सुखदेव जाधव यांनी प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर अखेर उपोषण मागे घेतले. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता सुरू झालेले हे आंदोलन दुसऱ्या दिवशी, २५ नोव्हेंबर रोजी संपुष्टात आले. नायब तहसीलदार चेयनसिंग बोहरे आणि संतोष सोनवणे यांच्या हस्ते सरबत देऊन त्यांचे उपोषण सोडविण्यात आले.

लेखी आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता

अंकुश जाधव यांच्या मागण्यांसंदर्भात तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय, सोयगाव यांनी २५ नोव्हेंबर रोजी पत्र क्रमांक २०२६/कावी/कक्ष-९९ अन्वये सोयगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पत्र पाठविले आहे.

गट क्रमांक १७ मधील सामाईक विहिरीत विनापरवानगी खोदकाम, ठिबक सिंचन आणि अवैध धंद्यांबाबत उपस्थित करण्यात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने पोलीस व ग्रामपंचायतीने आवश्यक कार्यवाही करून अर्जदारास कळवावे, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच अर्जदाराने तूर्त उपोषण मागे घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असेही कळविण्यात आले आहे.

विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची मध्यस्थी

उपोषण मागे घेण्यासाठी विविध राजकीय व शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली. यावेळी बसपाचे तालुकाध्यक्ष संघपाल सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दशरथ जलवार, शेतकरी संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्ष पुंडलिक कदम, शेतकरी संघटनेचे दिलीप लोखंडे, शेख रफिक आणि शेख नईम उपस्थित होते.

सर्वांच्या मध्यस्थीने तसेच तहसीलदार कार्यालयाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अंकुश जाधव यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.

प्रशासनाकडून लवकर कार्यवाहीची अपेक्षा

उपोषण मागे घेतल्यानंतर अंकुश जाधव म्हणाले, “नायब तहसीलदार साहेबांनी स्वतः सरबत देऊन माझे उपोषण सोडवले. सर्व नेत्यांनी मध्यस्थी केली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानुसार लवकरात लवकर कार्यवाही करावी, हीच अपेक्षा आहे.”

Share.
Leave A Reply

Exit mobile version