मलकापूरमध्ये कोर्ट फी स्टॅम्पचा तुटवडा; सर्वसामान्यांना आर्थिक भुर्दंड!
पाच आणि दहा रुपयांचे स्टॅम्प गायब; नाइलाजाने २० रुपयांचे स्टॅम्प खरेदी करण्याची वेळ, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा
मलकापूर (प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरासह परिसरात पाच आणि दहा रुपये किमतीच्या कोर्ट फी स्टॅम्पचा तुटवडा निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. शासकीय कामकाजासाठी आवश्यक असलेले कमी किमतीचे स्टॅम्प उपलब्ध नसल्याने नागरिकांना नाइलाजाने २० रुपयांचे कोर्ट फी स्टॅम्प खरेदी करावे लागत आहेत. परिणामी, नागरिकांवर विनाकारण अतिरिक्त आर्थिक भार पडत असून, हा नागरिकांचा आर्थिक भुर्दंड की प्रशासनाचा भोंगळ कारभार, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मलकापूर शहरप्रमुख हरिदास देवाजी गणगास यांनी महाराष्ट्र शासनाच्या प्रधान सचिव (लेखा व कोषागारे) यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. मलकापूर शहर आणि परिसरात पाच व दहा रुपयांचे कोर्ट फी स्टॅम्प मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, शासकीय कामकाजासाठी आवश्यक असलेल्या पाच व दहा रुपयांच्या कोर्ट फी स्टॅम्पचा नियमित पुरवठा होत नसल्याने नागरिकांना अधिक किमतीचे स्टॅम्प खरेदी करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. विशेषतः सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी तसेच विविध शासकीय कामांसाठी कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. किरकोळ रकमेच्या स्टॅम्पसाठीही अधिक पैसे मोजावे लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
नागरिकांनी किती दिवस सहन करायचा अतिरिक्त आर्थिक भार?
शासन एकीकडे नागरिकांना सुलभ आणि पारदर्शक सेवा देण्याचा दावा करीत असताना, दुसरीकडे आवश्यक कोर्ट फी स्टॅम्पच उपलब्ध होत नसतील, तर पुरवठा व्यवस्थेचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही समस्या केवळ स्टॅम्पच्या उपलब्धतेपुरती मर्यादित नसून नागरिकांच्या दैनंदिन शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणारी आहे.
शासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन मलकापूर शहरासह परिसरात पाच व दहा रुपयांचे कोर्ट फी स्टॅम्प पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा मलकापूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शहरप्रमुख हरिदास देवाजी गणगास यांनी दिला आहे.
आता शासनाचे संबंधित अधिकारी या समस्येकडे किती गांभीर्याने पाहतात आणि सर्वसामान्य नागरिकांची या अतिरिक्त आर्थिक भुर्दंडातून कधी सुटका होते, याकडे मलकापूरकरांचे लक्ष लागले आहे.
