Spread the love

भवरखेडे जिल्हा परिषद शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा!

विद्यार्थ्यांनी केले उद्देशिकेचे सामूहिक वाचन; संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाच्या मूल्यांचा जागर

भवरखेडे (प्रतिनिधी : अजय बाविस्कर) : भारतीय संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये तसेच नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशाने भवरखेडे येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची निर्मिती, संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्ये तसेच समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या संविधानिक मूल्यांची माहिती देण्यात आली.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी संविधानाच्या महत्त्वावर आपले मनोगत व्यक्त केले. तसेच संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधानाप्रती आदर आणि निष्ठा व्यक्त केली.

भारतीय संविधान हे प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणारे आणि देशाच्या लोकशाहीचा भक्कम पाया असलेले महान दस्तऐवज आहे. विद्यार्थ्यांनी लहान वयापासूनच संविधानातील मूल्ये आत्मसात करून जबाबदार नागरिक बनावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी वाजपेयी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संविधान दिनानिमित्त शाळेच्या परिसरात उत्साहपूर्ण आणि देशभक्तीपर वातावरण निर्माण झाले होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version