Spread the love

कानळदा येथे संविधान दिन उत्साहात साजरा!

विद्यार्थिनींनी घेतली संविधान निष्ठेची सामूहिक शपथ; डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

कानळदा (प्रतिनिधी) : येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेत गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात आणि आदरपूर्वक साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थिनींनी संविधान निष्ठेची सामूहिक शपथ घेत लोकशाही मूल्यांप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सोनवणे सर होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी महामानवाला अभिवादन केले.

यावेळी भारतीय संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या संविधानातील मूलभूत तत्त्वांविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. संविधानाने नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये यांचीही जाणीव करून देण्यात आली. त्यानंतर शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थिनींनी संविधान दिनानिमित्त सामूहिक शपथ घेतली.

या प्रसंगी सूर्यभान साळुंखे सर आणि अनिल पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थिनींनी संविधानातील मूल्ये आपल्या दैनंदिन जीवनात अंगीकारावीत आणि जबाबदार नागरिक बनावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा जावळे मॅडम यांनी केले, तर वर्षा खैरनार मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये संविधानाविषयी आदर, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समता आणि लोकशाही मूल्यांची जाणीव अधिक दृढ झाली. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

संविधानाचा मान, देशाचा अभिमान!

Share.
Leave A Reply

Exit mobile version