धुळे बसस्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या; संविधान सेनेचे महा मुक्काम आंदोलन!
सहा डिसेंबरपर्यंत नामकरण न झाल्यास अन्नत्याग आंदोलनाचा इशारा; संविधान दिनी परिवहन विभागाच्या कार्यालयाबाहेर आंदोलनाला सुरुवात
धुळे (प्रतिनिधी) : धुळे बसस्थानकाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय संविधान सेनेच्या वतीने परिवहन विभागाच्या धुळे विभागीय कार्यालयाबाहेर महा मुक्काम आंदोलन सुरू करण्यात आले आहे. येत्या ६ डिसेंबरपर्यंत नामकरणाचा निर्णय न झाल्यास अन्नत्याग आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भारतीय संविधान सेनेचे आनंद लोंढे यांनी परिवहन विभागाला दिला आहे. संविधान दिनानिमित्त संविधानाचे पूजन करून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
धुळे बसस्थानकासह उभारण्यात येत असलेल्या नवीन बसस्थानक संकुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, यासाठी गेल्या दीड ते दोन वर्षांपासून भारतीय संविधान सेनेच्या वतीने पाठपुरावा सुरू आहे. मात्र, वारंवार मागणी करूनही निर्णय होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. मागणीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे संघटना आक्रमक झाली असून, संविधान दिनाचे औचित्य साधून विभागीय परिवहन कार्यालयाबाहेर महा मुक्काम आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
सहा डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याची मागणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बसस्थानकाचे नामकरण व्हावे, ही मागणी मान्य करण्यासाठी परिवहन विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली आहे. ६ डिसेंबरपर्यंत नामकरणाबाबत सकारात्मक निर्णय न झाल्यास अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याचा इशारा आनंद लोंढे यांनी दिला आहे.
या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना तसेच सामाजिक कार्यकर्त्यांकडून पाठिंबा मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात या आंदोलनाची दिशा काय राहणार, याकडे धुळेकरांचे लक्ष लागले आहे.
या आंदोलनात भारतीय संविधान सेनेचे आनंद लोंढे, इंजिनीअर रवींद्र पवार, आबा अमृतसागर, सिद्धार्थ जगदेव, सम्राट देवरे, हरिश्चंद्र लोंढे, गोपाल शिरसाट, भाऊसाहेब बैसाणे, महिला जिल्हाध्यक्ष ज्योती रावत यांच्यासह अनेक आंदोलक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
