Spread the love

नशिराबाद येथे संविधान सन्मान गौरव दिन उत्साहात साजरा!

तथागत गौतम बुद्ध विहारात संविधानाचे पूजन व उद्देशिकेचे सामूहिक वाचन; २६/११ हल्ल्यातील शहीद जवानांना मानवंदना

नशिराबाद (प्रतिनिधी) :

भारतीय संविधानाचा गौरव, संविधानिक मूल्यांची जपणूक आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी नशिराबाद येथे बौद्ध समाज पंचम मंडळाच्या वतीने ७७ वा संविधान सन्मान गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तथागत गौतम बुद्ध विहार येथे आयोजित या कार्यक्रमात भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन, संविधान पूजन आणि संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जयंती समितीचे अध्यक्ष अभय सपकाळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बौद्ध समाजाचे अध्यक्ष विनोद रंधे यांच्या हस्ते भारतीय संविधानाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर तुषार रंधे सर यांच्या हस्ते संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना विनोद रंधे यांनी संविधानाने दिलेली न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकारावीत, असे आवाहन केले. सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव टिकविण्यासाठी संविधानातील तत्त्वांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशाच्या संरक्षणासाठी लढताना शहीद झालेल्या वीर जवानांना मानवंदना देऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या कार्यक्रमाला बौद्ध समाजातील उपासक-उपासिका तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शांताराम सोनवणे, प्रकाश सोनवणे गुरुजी, राजू वाघ, रतन सुरवाडे, वसंत, विपुल रंधे, प्रकाश रगडे, यश बिराडे, प्रकाश रंधे आणि बापू रंधे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप सुरवाडे यांनी केले, तर पंकजा रंधे यांनी आभार मानले. संविधानिक मूल्यांचा सन्मान आणि सामाजिक एकतेचा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली.

Share.
Leave A Reply

Exit mobile version