संघमा चौकात संविधान जनजागृती कार्यक्रम उत्साहात!
संविधानिक मूल्यांचा विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न; अधिकार आणि कर्तव्यांवर मार्गदर्शन
धुळे, दि. २६ नोव्हेंबर : भारतीय संविधान दिनानिमित्त धुळे शहरातील संघमा चौक येथे धुंजन फेलो केतन निकम यांच्या वतीने संविधान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये तसेच संविधानिक मूल्यांविषयी समाजात जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाला परिसरातील महिला, नागरिक आणि लहान मुला-मुलींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी क्रांतीगीताचेही सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आनंद शिंदे यांनी संविधानाची निर्मिती, त्याचे महत्त्व, नागरिकांचे मूलभूत अधिकार व कर्तव्ये याविषयी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही संविधानाची मूलभूत मूल्ये असून, त्यांची जाणीव समाजातील प्रत्येक घटकाला असणे आवश्यक आहे. विशेषतः बालवयापासूनच मुलांमध्ये संविधानिक मूल्यांची रुजवण झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
यानंतर मनोज नगराळे यांनी सामाजिक परिवर्तन, समता आणि अन्यायाविरोधातील संघर्षाचा विचार मांडणारी गीते सादर केली. गीतांच्या माध्यमातून उपस्थितांमध्ये सामाजिक जाणीव आणि संविधानिक मूल्यांविषयी जागर निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सागर शिरसाठ, विजय भामरे, योगेश शिरसाठ, मयुरी जाधव आणि मनोज नगराळे यांनी विशेष योगदान दिले. यावेळी कवी भास्कर अमृतसागर आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बागुल यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘संविधान केवळ पूजायचे नाही, तर वाचायचे, समजून घ्यायचे आणि आचरणात आणायचे आहे,’ हा महत्त्वपूर्ण संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
