पुणे : पुणे महापालिकेच्या विकासकामांमधील निकृष्ट दर्जा, कामांमधील दिरंगाई आणि मोजमापातील कथित अनियमिततांना आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता कठोर पावले उचलली आहेत. यापुढे शहरातील प्रत्येक विकासकामाची त्रयस्थ संस्थेमार्फत (थर्ड पार्टी) गुणवत्ता तपासणी केली जाणार असून, कामाच्या प्रत्येक टप्प्याचे जिओ-टॅग छायाचित्रणही बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अंतिम देयक अदा करण्यापूर्वी दक्षता विभागाकडून तपासणी करून घेणे अनिवार्य असेल. कामाच्या गुणवत्तेत त्रुटी किंवा मोजमापात अनियमितता आढळल्यास संबंधित अभियंत्यांवर थेट शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिला आहे.
महापालिकेमार्फत शहरात रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, बांधकामे आणि अन्य पायाभूत सुविधांची विविध विकासकामे केली जातात. मात्र, यातील अनेक कामांच्या दर्जाबाबत नागरिकांकडून तसेच विविध सामाजिक संस्थांकडून सातत्याने तक्रारी केल्या जातात. काही ठिकाणी कामे निर्धारित वेळेत पूर्ण होत नसल्याचेही समोर येते. विकासकामांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च होऊनही अपेक्षित दर्जा मिळत नसल्याच्या तक्रारींची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे.
त्यानुसार प्रत्येक विकासकामाची बाह्य संस्थेमार्फत गुणवत्ता तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी आवश्यक सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्याची प्रक्रिया शहर अभियंता कार्यालयाने तातडीने सुरू करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. काम सुरू होण्यापूर्वी, काम सुरू असताना आणि काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित कनिष्ठ अभियंत्यांना अक्षांश-रेखांशासह जिओ-टॅग छायाचित्रे नोंदवावी लागणार आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष जागेवरील कामाची स्थिती, प्रगती आणि पूर्णत्व यावर लक्ष ठेवणे प्रशासनाला शक्य होणार आहे.
कनिष्ठ अभियंत्यांपासून मुख्य अभियंत्यांपर्यंत जबाबदारी निश्चित
विकासकामांची गुणवत्ता तपासणे, प्रत्यक्ष मोजमाप घेणे आणि त्याची अचूक नोंद मोजमाप पुस्तिकेत करणे ही शंभर टक्के जबाबदारी संबंधित अभियंत्यांची असेल. मात्र, संपूर्ण जबाबदारी कनिष्ठ अभियंत्यांवर ढकलून वरिष्ठ अधिकाऱ्यांना हात झटकता येणार नाही, हेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
उपअभियंता, कार्यकारी अभियंता, सहाय्यक आयुक्त, अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता या सर्व स्तरांवरील अधिकाऱ्यांना संबंधित कामांची प्रत्यक्ष पाहणी करून गुणवत्तेची खातरजमा करावी लागणार आहे. याशिवाय अतिरिक्त आयुक्तांनीही त्यांच्या अखत्यारीतील निवडक विकासकामांची तपासणी करून त्याचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
अंतिम बिलापूर्वी दक्षता विभागाची तपासणी अनिवार्य
या नव्या कार्यपद्धतीतील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे विकासकामांचे अंतिम बिल अदा करण्यापूर्वी दक्षता विभागाकडून तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या तपासणीमध्ये कामाचा प्रत्यक्ष दर्जा, मोजमाप, मंजूर अंदाजपत्रक आणि प्रत्यक्ष खर्च यांची पडताळणी केली जाणार आहे. त्याचबरोबर वित्तीय मान्यता, काम पूर्ण करण्याचा निर्धारित कालावधी, विमा आणि अन्य आवश्यक कागदपत्रांचीही छाननी केली जाणार आहे.
दिरंगाई आणि निकृष्ट कामांना जबाबदार कोण?
महापालिकेच्या विकासकामांमध्ये गुणवत्ता राखण्याबरोबरच प्रशासकीय उत्तरदायित्व निश्चित करण्याचा आयुक्तांचा हा प्रयत्न महत्त्वपूर्ण मानला जात आहे. कामाच्या गुणवत्तेत त्रुटी, मोजमापातील अनियमितता, कामात दिरंगाई अथवा वरिष्ठांनी दिलेल्या आदेशांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी आणि अभियंत्यांवर नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.
त्यामुळे आता विकासकामांच्या निविदा काढण्यापासून ते प्रत्यक्ष काम पूर्ण होऊन अंतिम बिल अदा होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर प्रशासनाची नजर राहणार आहे. या निर्णयामुळे पुणे महापालिकेतील विकासकामांच्या दर्जात सुधारणा होण्याबरोबरच सार्वजनिक निधीच्या वापरात पारदर्शकता येते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
