जळगाव : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी गुरुवारी अचानक विशेष धडक मोहीम हाती घेतली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी ६ वाजेपासून जिल्हाभरात नाकाबंदी आणि वाहन तपासणी सुरू करण्यात आली. शहरापासून ग्रामीण भागापर्यंत पोलीस पथके रस्त्यावर उतरल्याने नियमभंग करणाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे.
उघड्यावर मद्यप्राशन, गांजाचे सेवन करणाऱ्यांवर कारवाई
सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यप्राशन करणारे, गांजाचे सेवन करणारे तसेच टवाळखोरी करून नागरिकांना त्रास देणाऱ्या व्यक्तींवर पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सार्वजनिक शांतता भंग करणारे आणि सामाजिक वातावरण बिघडविणाऱ्या घटकांची तपासणी करून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जात आहे.
बुलेटचा कर्णकर्कश आवाज, ट्रिपल सीटस्वारही रडारवर
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांचीही या मोहिमेत कसून तपासणी केली जात आहे. बुलेटसारख्या वाहनांमधून नियमबाह्य सायलेन्सरचा वापर करून कर्णकर्कश आवाज करणारे, ट्रिपल सीट प्रवास करणारे तसेच वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या चालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. नाकाबंदीच्या ठिकाणी वाहनांची कागदपत्रे तपासण्यासह संशयास्पद हालचाली करणाऱ्यांची चौकशी केली जात आहे.
जिल्हाभर पोलीस यंत्रणा अलर्ट
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत शहर आणि ग्रामीण भागातील पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे. नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, सार्वजनिक ठिकाणचे गैरप्रकार रोखले जावेत आणि वाहतूक शिस्तीचे पालन व्हावे, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती आहे.
