मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला आता मनमाड रेल्वे स्थानकावर नियमित व्यावसायिक थांबा देण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी सुरू झाली असून, त्यामुळे मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मनमाड हे उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असल्याने या ठिकाणी वंदे भारत एक्स्प्रेसला थांबा मिळावा, अशी मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती.
यापूर्वी ही गाडी मनमाड स्थानकावर तांत्रिक अथवा परिचालनविषयक कारणांसाठी थांबत असली, तरी तो व्यावसायिक थांबा नसल्यामुळे प्रवाशांना गाडीत चढणे किंवा उतरणे शक्य नव्हते. परिणामी, परिसरातील नागरिकांना या आधुनिक रेल्वेसेवेचा प्रत्यक्ष लाभ घेता येत नव्हता.प्रवाशांची मागणी आणि मनमाड स्थानकाचे भौगोलिक महत्त्व विचारात घेऊन रेल्वे प्रशासनाने अखेर नियमित व्यावसायिक थांब्याचा निर्णय घेतला. यामुळे आता मनमाड आणि परिसरातील प्रवाशांना मुंबई तसेच साईनगर शिर्डीकडे जाण्यासाठी वेगवान रेल्वेसेवेचा पर्याय उपलब्ध झाला आहे. विशेषतः मुंबईकडे प्रवास करणारे व्यावसायिक, नोकरदार, विद्यार्थी आणि शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांसाठी हा निर्णय उपयुक्त ठरणार आहे.
