दुःखाच्या क्षणी जीपीएस मित्र परिवाराचा आधार; सेवाकार्याला दातृत्वाची साथ!
युवा नेते प्रतापराव पाटील यांच्या पुढाकाराला बळ; उद्योजक अनिलभैया कासट यांच्याकडून ३० हजार गोवऱ्यांचे योगदान
जीपीएस मित्र परिवाराच्या वतीने कासट यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान
पाळधी/जळगाव (प्रतिनिधी) : समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखात सहभागी होत माजी जिल्हा परिषद सदस्य तथा युवा नेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जीपीएस मित्र परिवार विविध समाजोपयोगी उपक्रम राबवित आहे. या सेवाकार्याला दातृत्वाची साथ देत पाळधी येथील उद्योजक अनिलभैया कासट यांनी अंत्यविधीसाठी अल्पदरात गोवऱ्या उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमासाठी तब्बल ३० हजार गोवऱ्यांचे योगदान दिले आहे. त्यांच्या या सामाजिक योगदानाबद्दल जीपीएस मित्र परिवाराच्या वतीने त्यांच्या वीटभट्टीवर जाऊन कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला.
जीपीएस मित्र परिवाराच्या माध्यमातून मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया, गरजू नागरिकांना ब्लँकेट वाटप, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा अशा विविध समाजोपयोगी सेवा सातत्याने राबविल्या जात आहेत. कुटुंबावर दुःखाचा प्रसंग ओढवल्यानंतर अंत्यविधीच्या साहित्याची जुळवाजुळव करताना होणारी धावपळ आणि आर्थिक भार कमी व्हावा, या सामाजिक जाणिवेतून अंत्यविधीसाठी गाईच्या शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्या अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या उपक्रमाला संस्थापक तथा ज्येष्ठ उद्योजक शरदचंद्र कासट यांचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे. जीपीएस मित्र परिवाराच्या सेवाभावी कार्याची उपयुक्तता लक्षात घेऊन अनिलभैया कासट यांनी स्वखर्चातून ३० हजार गोवऱ्यांचे योगदान दिले. दुःखाच्या प्रसंगी सामान्य कुटुंबांना दिलासा देणाऱ्या या उपक्रमाला मिळालेली ही मदत सामाजिक दातृत्वाचे उदाहरण ठरत आहे.
युवा नेते प्रतापराव पाटील यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या सेवाकार्याला समाजातील दानशूर व्यक्तींची साथ मिळत असल्याने पाळधी परिसरातील सामाजिक एकोपा आणि परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ होत आहे. गरजूंना मदतीचा हात देण्याच्या या कार्याबद्दल जीपीएस मित्र परिवाराच्या वतीने अनिलभैया कासट यांचे आभार मानण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी युवा नेते प्रतापराव पाटील, उद्योजक अनिलभैया कासट, माजी सरपंच अरुण पाटील, प्रशांत झंवर, अनिल माळी, आबा माळी, दिनेश कडोसे, मुकेश भोई, चेतन झंवर, कल्पेश कोळी, सचिन भोई, शरद चौधरी, राहुल बिऱ्हाडे, गौरव महाजन वंजारी, माजी सरपंच गणेश महाजन, दिलीप माळी, विजय धोबी, चंदू इंगळे, सागर पाटील, सोपान माळी, योगेश माळी, भूषण महाजन, चंदूमामा, भागवत धनगर, राहुल चव्हाण यांच्यासह जीपीएस मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते.
