Spread the love

विटवे ग्रामपंचायत कार्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा!

लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग; संविधानिक मूल्यांच्या जतनाचा संकल्प

विटवे : भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाच्या गौरवशाली वारशाचे स्मरण करून देणारा २६ नोव्हेंबर हा संविधान दिन विटवे ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या उत्साहात आणि वैचारिक वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

विटवे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात भारतीय संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्ये, सामाजिक समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूलभूत तत्त्वांवर विचारमंथन करण्यात आले. संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेले अधिकार आणि त्यासोबतच असलेल्या कर्तव्यांची जाणीव ठेवून संविधानिक मूल्यांचे आचरण करणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. संविधानातील मूल्ये प्रत्येक नागरिकाने आत्मसात करून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही करण्यात आले.

या कार्यक्रमाला लोकनियुक्त सरपंच मुकेश चौधरी, उपसरपंच ईश्वर चौधरी, ग्रामपंचायत सदस्य साहेबराव वानखेडे, गणेश मनुरे, मधुकर पाटील, सुरेश कोळी, गजानन कोळी, पोलीस पाटील बाळू पवार, कैलास मनुरे, विमलबाई भिल्ल यांच्यासह विटवे गावातील संघर्ष मित्र मंडळाचे सदस्य आणि विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रमातून संविधानाचा विचार, सामाजिक एकात्मता, समता आणि बंधुतेचा संदेश देण्यात आला. संविधानाचा सन्मान राखणे, संविधानिक मूल्यांचे जतन करणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणे, असा संकल्प व्यक्त करत विटवे ग्रामपंचायत कार्यालयातील संविधान दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

जय भीम! जय संविधान!

Share.
Leave A Reply

Exit mobile version