वकिलाच्या पत्नीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने साक्रीत खळबळ!
घरापासून अवघ्या ५० ते ६० फुटांवर मृतदेह; घातपाताचा संशय व्यक्त, फॉरेन्सिक पथकाकडून तपास
साक्री : साक्री शहरात एका ५० वर्षीय विवाहित महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पूजा रवींद्र शिरसागर (वय ५०) असे मृत महिलेचे नाव असून त्या साक्री येथील ॲड. रवींद्र शिरसागर यांच्या पत्नी होत्या. या घटनेमुळे मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून घातपाताची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ नोव्हेंबर रोजी पूजा शिरसागर या घरातून बाहेर गेल्यानंतर काही काळाने घरापासून अवघ्या ५० ते ६० फुटांच्या अंतरावर त्यांचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच साक्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली असून फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने पुरावे संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
घरापासून अगदी जवळच महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने हा अपघात आहे की घातपात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून सर्व शक्यता पडताळून तपास सुरू आहे.
या प्रकरणी साक्री पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. फॉरेन्सिक तपास आणि पोलिसांच्या पुढील तपासातूनच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
