Spread the love

परभणी जिल्हा रुग्णालयातील रोजंदारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा!

१० ते १२ वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांची मागणी; किशोर दादा पवार यांच्याकडे शिष्टमंडळाचे निवेदन, मंत्रालय स्तरावर पाठपुराव्याचे आश्वासन

परभणी | प्रतिनिधी : परभणी येथील वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या १० ते १२ वर्षांपासून रोजंदारी आणि कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यात यावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने लोकशाही पत्रकार महासंघ, भारताचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष किशोर दादा पवार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

या संपूर्ण विषयाचा पुढाकार आणि नेतृत्व व्रणोपचार कर्मचारी श्रीकांत एकनाथ चव्हाण यांनी केले. त्यांनी कर्मचारी टीम व शिष्टमंडळासह किशोर दादा पवार यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या सेवाकाळातील अडचणी, प्रलंबित प्रश्न आणि कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याची मागणी सविस्तरपणे मांडली.

कोरोना काळातही बजावली निष्ठेने रुग्णसेवा

परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात संबंधित कर्मचारी गेल्या १० ते १२ वर्षांपासून रोजंदारी आणि कंत्राटी तत्त्वावर सेवा बजावत आहेत. कोरोना महामारीच्या अत्यंत कठीण काळातही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी रुग्णसेवेचे कर्तव्य पार पाडले. वरिष्ठांच्या आदेशानुसार विविध जबाबदाऱ्या निष्ठेने पार पाडून रुग्णालयीन सेवेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. मात्र, प्रदीर्घ सेवेनंतरही कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यात आले नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

शासन निर्णयानुसार लाभ देण्याची मागणी

शिष्टमंडळाने सादर केलेल्या निवेदनात दि. १४ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयाचा संदर्भ देण्यात आला आहे. या निर्णयानुसार दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासंदर्भातील तरतुदींचा लाभ मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या बैठकीत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NRHM) अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासंदर्भातील निर्णय व तरतुदींचा लाभ देण्यात यावा, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली.

महिला व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कर्मचाऱ्यांचा प्रश्न

संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये महिला, विधवा महिला तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह या नोकरीवर अवलंबून आहे. अनेक वर्षे सेवा करूनही नोकरीची शाश्वती नसल्याने त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक आणि सामाजिक असुरक्षिततेचे सावट आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा प्रदीर्घ सेवाकाळ आणि कौटुंबिक परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याबाबत सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा, अशी विनंती शिष्टमंडळाने केली.

मंत्रालय स्तरावर पाठपुराव्याचे आश्वासन

किशोर दादा पवार यांनी कर्मचाऱ्यांचे निवेदन स्वीकारून संपूर्ण विषय गांभीर्याने समजून घेतला. या प्रश्नावर मंत्रालय स्तरावर संबंधित विभाग आणि मंत्र्यांकडे पाठपुरावा करून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.

या भेटीदरम्यान लोकशाही पत्रकार महासंघ, भारताचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप जाधव साहेब हेही उपस्थित होते. त्यांनीदेखील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून त्यांच्या मागण्यांना न्याय मिळावा, यासाठी सकारात्मक भूमिका व्यक्त केली.

श्रीकांत एकनाथ चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील कर्मचारी शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांसाठी शासन स्तरावर ठोस पाठपुरावा करण्याची अपेक्षा व्यक्त केली. अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला आता मंत्रालय स्तरावर कितपत प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version