Spread the love

 

संविधानिक मूल्यांच्या जतनासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा : प्रा. रमेश सरदार

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात संविधान दिन उत्साहात; उद्देशिकेचे सामूहिक वाचन, २६/११ च्या हुतात्म्यांना भावपूर्ण अभिवादन

जळगाव : भारतीय संविधानाने देशाच्या लोकशाही आणि शासनव्यवस्थेला भक्कम अधिष्ठान दिले आहे. संविधानातील स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या मूलभूत मूल्यांचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी युवकांनी स्वीकारली पाहिजे. संविधानिक जागरूकता ही सक्षम लोकशाहीची पूर्वअट असून, युवकांनी आपल्या घटनात्मक अधिकारांसोबतच कर्तव्यांचेही भान ठेवून सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे प्रतिपादन वाणिज्य प्रशाळेचे संचालक प्रा. रमेश सरदार यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्रे प्रशाळेच्या वतीने २६ नोव्हेंबर २०२६ रोजी संविधान दिनानिमित्त प्रशाळेच्या सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या प्रा. पवित्रा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

संविधानातील मूल्ये आचरणात आणण्याचे आवाहन

यावेळी प्रा. पवित्रा पाटील यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व विशद केले. संविधान हे सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेचा आधारस्तंभ असून, प्रत्येक नागरिकाच्या अधिकारांचे संरक्षण करणारी आणि न्यायाधिष्ठित समाजव्यवस्थेची हमी देणारी महत्त्वपूर्ण चौकट आहे. संविधानातील मूल्यांची केवळ माहिती असणे पुरेसे नसून ती आपल्या दैनंदिन आचरणात आणणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक जागरूकता निर्माण करणे, लोकशाही मूल्यांची रुजवणूक करणे आणि युवकांना त्यांच्या घटनात्मक अधिकार व कर्तव्यांची जाणीव करून देणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

उद्देशिकेचे सामूहिक वाचन; हुतात्म्यांना अभिवादन

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. विजय घोरपडे यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. यावेळी उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधानातील मूलभूत मूल्यांप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.

दरम्यान, २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले सैनिक, पोलीस अधिकारी तसेच प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती

या कार्यक्रमाला सामाजिकशास्त्रे प्रशाळेतील डॉ. मनोज इंगोले, डॉ. दिगंबर सावंत, डॉ. अभय मनसरे, डॉ. सुषमा तीनगोटे, डॉ. गोपाळ पाटील, प्रा. वर्षा पालखे, प्रा. विनेश पावरा, प्रा. वीरेश पाटील, डॉ. शीतल पाटील, डॉ. पोर्णिमा वाहने, डॉ. गजानन देशमाने, डॉ. ज्ञानोबा सोनटक्के, डॉ. विशाल सपकाळे, प्रा. इशिका गुप्ता, अध्यापन सहाय्यक सायली बडगुजर, डॉ. मनोज सोनोने, प्रा. जयेश सोनार, प्रा. बी. एल. पवारा, विजय कोळी, जगदीश अत्रे आणि सुरेश नन्नावरे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. विजय घोरपडे यांनी केले. यावेळी सामाजिकशास्त्रे प्रशाळेतील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version