जळगाव : ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना चालना मिळावी म्हणून नुकत्याच घेण्यात आलेली जळगाव ग्रामीण प्रीमियर लीगचे दुसरे पर्व मोठ्या उत्साहात संपन्न झाले असून या स्पर्धेत किरणदादा पाटील युवा मंच सतखेडा या संघाने विजेतेपद मिळवले. मात्र या स्पर्धेत आपल्या सांघिक कामगिरीच्या जोरावर एका संघाने सगळ्यांची मन जिंकत दिमाखदार कमिगिरी केली. नानाश्री फाऊंडेशन या संघाने या स्पर्धेत आपल्या अफलातून फटकेबाजीने सगळ्या क्रिकेटप्रेमीची मन जिंकत स्पर्धेचे तिसरे बक्षीसही पटकावले.
जळगाव ग्रामीण स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्यामार्फत 1 ते 5 एप्रिल दरम्यान शहरातील शिवतीर्थ मैदानावर जळगाव ग्रामीण प्रिमियर लीगचे दुसरे पर्व संपन्न झाले. या स्पर्धेत तब्बल 22 संघांचा सहभाग होता. दरम्यान सदर स्पर्धेत जिल्हा मार्केटींग फेडरेशनचे संचालक शांताराम सोनवणे तथा युवासेनेचे स्वप्निल सोनवणे यांच्या मालकीच्या नानाश्री फाऊंडेशन संघाने किरण पाटील यांच्या नेतृत्वात सांघिक कामगिरी केली.
स्पर्धेतील पहिल्या सामन्यात नानाश्री फाऊंडेशन संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर चंद्रावर्षा इंटरप्रायजेस संघाचा 9 बळी राखत एकतर्फी असा विजय मिळवत स्पर्धेचा विजयी शुभारंभ केला. दुसऱ्या सामन्यात फलंदाजांच्या तडाखेबंद कामिगिरीने श्री कन्स्ट्रक्शन संघाचा 22 धावांनी पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला.या फेरीत नानाश्री फाऊंडेशन संघाने गजानन बापू युवा मंच या संघाला आपल्या सांघिक कामगिरीच्या जोरावर चारीमुंड्या चित करत 14 धावांनी विजय मिळवला व दिमाखात उपांत्य फेरीत धडक दिली.
उपांत्य फेरीत किरणदादा युवा मंच संघ मात्र वरचढ ठरला व नानाश्री फाऊंडेशन संघाला स्पर्धेतील आपल्या पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले व विजेतेपदाचे स्वप्नभंग झाले. मात्र या पराभवाने खचून न जाता नानाश्री फाऊंडेशन संघाने तिसऱ्या क्रमांकाच्या विजेतेपदासाठीच्या सामन्यात स्व. संभाजी आबा फाऊंडेशन संघाचा सुपरओव्हर मध्ये थरारक विजय मिळवत तिसऱ्या विजेतेपदावर नाव कोरले.
स्पर्धेत रुपेश चौधरी या खेळाडूने आपल्या धमाकेदार फलंदाजीने विरोधकांना चिटपत करत तब्ब्ल 20 षटकार लागवत 2 अर्धशतकांसह 213 धावा ठोकून काढल्यात. तर शशांक पाटील यांनीही दमदार असा अष्टपैलू खेळ दाखवत 16 षटकारांसह 130 धावा तर 8 बळी घेतले. भूषण चव्हाण ( 52 धावा व 5 बळी ), विशाल राजपूत ( 4 बळी ) व शुभम पाटील ( 3 बळी ) यांनीही आपल्या नेत्रदिपक कामगिरीने प्रेक्षकांची मने जिंकली. एकंदरीत संपूर्ण स्पर्धेत नानाश्री फाऊंडेशन संघाने आपल्या लढाऊ वृत्तीने व जिद्दीचा खेळ दाखवून ही स्पर्धा गाजवत प्रेक्षकांच्या मनात घर केले.
